सोन्याची कुर्‍हाड

एका गावातील एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी रानात गेला. नदीकाठी असलेले एक झाड पाहून तो ते झाड तोडू लागला. परंतु काही वेळातच अचानक हातातील कुर्‍हाड निसटून ती नदीच्या पाण्यात पडली. तेव्हा दुःखाने तो रडू लागला.

लाकूडतोड्याचे रडणे देवाने ऐकले. देव तिथे आला आणि त्याला म्हणाला, ‘‘असा का रडतोस बाबा? कसले संकट कोसळले तुझ्यावर?’’ तेव्हा लाकूडतोड्याने आपली कुर्‍हाड नदीत पडल्याचे सांगितले.

तेव्हा देव म्हणाला, ‘‘रडू नकोस, मी तुझी कुर्‍हाड काढून देतो.’’ असे म्हणून देवाने नदीत बुडी मारली आणि एक सोन्याची कुर्‍हाड घेऊन वर येऊन त्याला दाखवीत म्हटले, ‘‘अरे, हीच ना तुझी सोन्याची कुर्‍हाड?’’

त्यावर ‘नाही नाही’ असे लाकूडतोड्या म्हणताच देवाने पुन्हा नदीत उडी मारून रुप्याची कुर्‍हाड वर काढून दाखवीत म्हणाले, ‘‘मग हीच का?’’

त्यावर ‘‘हीही नाही’’ असे म्हणताच देवाने पुन्हा नदीत बुडी मारून त्याची स्वतःची पाण्यात पडलेली कुर्‍हाड वर आणून त्याला दाखविताच, ‘‘हो, हीच माझी कुर्‍हाड!’ असे म्हणत त्याने आनंद व्यक्त केला आणि देवाला धन्यवाद दिले.

त्याच्या वागण्यातील प्रामाणिकपणा पाहून देवाने संतुष्ट होऊन त्या सोन्या-रुप्याच्या दोन्ही कुर्‍हाडी त्याला बक्षीस दिल्या.

ही कथा लाकूडतोड्याच्या शेजार्‍याला समजताच त्याला लोभ सुटला आणि आपणही असेल करावे म्हणून तोही नदीकाठी आला आणि मुद्दामच आपली कुर्‍हाड पाण्यात टाकून नदीकाठी मोठमोठ्याने रडू लागला.

त्याचे रडणे ऐकून देव तेथे आला आणि पहिल्याप्रमाणेच पाण्यात उडी मारून एक सोन्याची कुर्‍हाड घेऊन वर आला आणि त्या माणसाला म्हणाला, ‘‘हीच का तुझी कुर्‍हाड?’’ सोन्याची कुर्‍हाड पाहून त्या लोभी माणसाला मोह आवरला नाही.

‘‘ती माझीच कुर्‍हाड!’’ असे म्हणत तो देवाच्या हातातील कुर्‍हाड घेण्यासाठी पुढे येताच देवाने त्याच्या लबाडपणाबद्दल त्याची चांगलीच खरडपट्टी काढीत निर्भत्सना केली.

सोन्याची कुर्‍हाड परत पाण्यात टाकून देवाची स्वारी अदृश्य झाली. अशा प्रकारे सोन्याची कुर्‍हाड तर दूरच; पण तो लोभी माणूस स्वतःची कुर्‍हाडदेखील गमावून बसला.

तात्पर्य – प्रामाणिक आणि साधे वर्तन सर्वांनाच आवडते. असा माणूस सर्वांनाच आवडतो. परंतु प्रामाणिकपणाचा नुसता देखावा करून जो लबाडी करायला धजावतो, त्याची लबाडी शेवटी उघडकीला येऊन फजितीच होते.