लांडगा आणि सिंह

एकदा सिंहमहाराज खूप आजारी पडले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दररोज कोणी ना कोणी त्यांच्याकडे हजेरी लावत असे.

अरण्यातील सर्व पशू आलटून-पालटून सिंहाच्या दरबारात येत असताना कोल्होबा मात्र आजपर्यंत तिकडे फिरकला नव्हता. असे असता कोल्हा अजून आला नाही, हे लांडग्यास समजले.

कोल्ह्याचे आणि लांडग्याचे मुळीच पटत नसे. ते एकमेकांचे वैरी झाले होते. या संधीचा फायदा घेऊन कोल्ह्याला चांगली अद्दल घडवावी, असे लांडग्याला वाटले. झाले!

त्याने सिंहाचे कान भरले. लांडगा सिंहास म्हणाला, ‘‘महाराज, आपण आजारी पडल्यापासून आजपर्यंत सर्व पशू आपल्या समाचाराला आले; पण कोल्होबा अजून एकदाही आपली विचारपूस करण्यास आला नाही. तो आपल्याविरुद्ध काही तरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’’

लांडग्याचे हे बोलणे ऐकताच ‘कोल्होबाने ताबडतोब महाराजांना भेटायला यावे’ असे फर्मान महाराजांनी काढले. कोल्ह्याला बोलावणे गेले.

तो दरबारात हजर झाला असता सिंहमहाराज म्हणाले, ‘‘काय रे उर्मटा, मी इतका आजारी झालो असताना आजपर्यंत तू एकदाही मला भेटायला आला नाहीस, त्याचे काय कारण?’’

यावर कोल्हा म्हणाला, ‘‘महाराज, मी आपल्याच कामगिरीवर होतो. इतके दिवस आपल्यासाठी एखादा चांगला वैद्य शोधत फिरत होतो. आता कालच मला एक मोठा नावाजलेला वैद्य भेटला आणि त्याने मला सांगितले की, नुकतंच काढलेलं ताजं लांडग्याचं कातडं पांघरलं असता आपला आजार संपूर्णपणे बरा होईल.’’

कोल्ह्याची थाप सिंहाला खरीच वाटली. त्याने कातडे मिळविण्यासाठी एका फटक्यातच जवळ उभ्या असलेल्या लांडग्याला ठार केलं.

तात्पर्य – दुसर्‍याचा नाश करायला टपलेले लोक स्वतःच विनाशाच्या गर्तेत सापडून नाश पावतात.