गाढवाचा गाढवपणा

एका माणसाने एक गाढव व एक कुत्रा पाळला होता. गाढव दिवसभर राबत असे; पण मालक त्याला कधी खायला देत नसे. ते बिचारे उकीरडे फुंकून आपले पोट कसेबसे भरीत असे.

याउलट कुत्रा काही काम न करता आरामात राहून आयते खात असे. मालकही त्या कुत्र्याचेच लाड करीत असे. हे पाहून गाढवाला खूपच वाईट वाटे.

कुत्रा मालकाच्या पुढे गोंडा घोळतो, त्याच्यापुढे उड्या मारतो, त्याच्या मांडीवर लाडे लाडे पाय ठेवतो; म्हणून बहुधा मालक त्याच्यावर जास्त प्रेम करीत असावा असे त्या गाढवाला वाटले. असा विचार करीत असतानाच मालकाची स्वारी बाहेरून आली व ओट्यावर बसली.

मालक ओट्यावर बसलेला पाहताच गाढव शेपटी हालवित लाडे लाडे त्याच्यापुढे आले. ते आनंदाने उड्या मारू लागले, ओरडू लागले. गाढवाचे हे वेडे चाळे पाहून मालक पोट धरून हसू लागला. ते पाहताच गाढवाला आणखी चेव आला. तो मागच्या पायांवर उभा राहिला आणि त्याने आपले पुढचे पाय मालकाच्या मांडीवर ठेवले आणि ते मालकाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करू लागले.

गाढवाचा तो गाढवपणा पाहून मालक घाबरून ओरडू लागला. मालक का ओरडतो, हे पाहण्यासाठी घरातील नोकर धावतच बाहेर आला. गाढवाने आरंभलेला खेळ पाहताच त्याने जवळच पडलेला एक जाडजूड सोटा उचलला आणि गाढवाला चांगलेच बदड बदड बदडले. खरपूस मार मिळताच गाढव ओरडतच दूर पळाले.

तात्पर्य – आपली लायकी न पाहता भलते साहस करण्याचा प्रयत्न केला, तर अंगाशी येते, याचे भान नेहमी ठेवावे.