सिद्धटेक (सिद्धीविनायक)

इतिहास

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धीविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून, सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते, मात्र त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला, मात्र १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

मंदिर

मंदिरातील सिद्धीविनायकाची मूर्ती स्वयंभू असून, ती तीन फूट उंच व अडीच फूट रूंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून, त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरूड यांच्या आकृत्या असून, मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

भौगोलिक

श्रीक्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.

सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात. दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी.वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)

सिद्धटेक (सिद्धीविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा