श्रीक्षेत्र पैठण

कसे याल?

औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्षं स्वत:चे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन काळापासून ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव ‘प्रतिष्ठान’) ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाºया इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते, पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.

एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की, साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाºयामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.

फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.

संत एकनाथ

संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म, संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ह्यज्ञानाचा एकाह्ण या बिरुदावलीने साºया महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमती पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ यादरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फारकाळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवनदरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरूकृपा आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती.

एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

ईश्वर हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो. त्यामुळेच संतांच्या जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न. पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता. तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली; परंतु परिस घेऊन आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही, हे जाणून नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्ताजवळ तो परिस सुरक्षित राहील, या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परिस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले. नाथांनी तो परिस देव्हाºयाखाली ठेवून दिला. ब-याच दिवसांनंतर तो सावकार परिस घेण्यासाठी नाथांकडे आला व परिसाची मागणी केली तेव्हा तो परिस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले.

परिस काही सापडेना… नाथ म्हणाले, कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच, तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण नि:स्वार्थ असाल असा विचार करून आपणाजवळ परिस ठेवण्यास दिला, मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले. तळात हात घालून ओंजळभर दगड उचलले व म्हणाले, तुझा परिस यातून निवडून घे.

त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देऊन बाकी सर्व नदीत टाकून दिले. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते, हे ठीक; परंतु नाथांच्या स्पर्शाने दगडाचे परिस होतात, हे मात्र विशेष.