घरकुल योजना राबवण्यासाठी संरक्षण खात्याची जमीन मनपाकडे तातडीने वर्ग करावी : आ.संग्राम जगताप

अहमदनगर – नगर महापालिकेच्या हद्दीत असलेली संरक्षण खात्याच्या मालकीची जमीन महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीधारकांसाठी घरकुल योजना राबवण्यासाठी ही जमीन महापालिकेच्या नावे होणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आमदार जगताप यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात कोठला, लालटाकी, रामवाडी या अघोषित झोपडपट्ट्या आहेत. पण या झोपडपट्ट्या असलेली जागा संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशानात ही बाब सरकारच्या निदर्शनासही आणली आहे, असे जगताप यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अध्यादेश काढून ’सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नगर शहरातील कोठला, लालटाकी, रामवाडी आदी झोपडपट्ट्यांतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याच्यादृष्टीने आताच कार्यवाही करून केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याकडे ती जमीन महापालिकेला वर्ग करण्यासाठी मागणी करावी. त्यामुळे त्या भागातील गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.