शिवसेनेच्या उमेदवारीसाठी नगर शहरातून पाच जणांच्या मुलाखती

अनिल राठोड, भगवान फुलसौंदर, सौ.शिलाताई शिंदे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांचा समावेश

अहमदनगर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सौ.शिलाताई अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे या पाच जणांनी बुधवारी (दि.18) दुपारी मुंबईतील शिवसेना भवन येथे मुलाखती दिल्या आहेत.

शिवसेनेने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया 10 सप्टेंबरपासून सुरु केलेली आहे. राज्यातील सर्वच मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. बुधवारी नगर जिल्ह्याच्या मुलाखती होत्या. त्यामध्ये नगर शहर मतदार संघातून पाच जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी प्रथमच शिवसेनेकडून उमेदवारी मागणार्‍या इच्छुकांची संख्या वाढली आहे. या मुलाखतीसाठी नगरमधून जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, योगिराज गाडे, अमोल येवले, निलेश भाकरे, अक्षय कातोरे, रविंद्र लालबोंद्रे, संजय छजलाणी, संतोष गेणप्पा, सुनील लालबोंद्रे, रावजी नांगरे, श्याम नळकांडे यांच्यासह पदाधिकारी मुंबईला गेले होते. दादर येथील शिवसेना भवनात या मुलाखती पार पडल्या आहेत.

पारनेरमधून संदेश कार्लेंची मुलाखत

पारनेर नगर मतदारसंघात विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष विजय औटी यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. मात्र या मतदार संघातही नगर शहराप्रमाणे इच्छुकांची संख्या वाढली असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समिती सभापती रामदास भोर, उपसभापती प्रविण कोकाटे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, उपप्रमुख प्रकाश कुलट, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, विश्‍वास जाधव आदी उपस्थित होते.