शेवगावला भागवत कथा सोहळ्याचे आयोजन

शेवगाव- शेवगाव येथे प्रभातफेरी परिवाराच्यावतीने आयोजित जोधपूर निवासी गोवत्स राधाकृष्ण महाराजांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या कथा मंडपाचे स्तंभपूजन श्रीकृष्ण गोशाळेचे संचालक हरी महाराज घाडगे यांच्या हस्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.

शहरातील खंडोबा मैदानाच्या विशाल प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या वृंदावनधाम नगरीत गोवत्स राधाकृष्ण महाराजांच्या सुमधूर वाणीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा पार पडणार आहे. 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत रोज दुपारी राधाकृष्ण महाराज कथा निरुपण करतील.

स्तंभपूजनास वेदमूर्ती राम मुळे, रामदयाळ लाहोटी, खंडू बुलबुले, भगवान धूत, बापूसाहेब गवळी, ’प्रभातफेरी परिवारचे द्वारकानाथ बिहाणी, तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष प्रकाश लड्डा आदींसह भाविक उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात येऊन दुपारी 2 वा. संतमहंतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ होईल. यावेळी देवगड दत्त संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, प्रज्ञाचक्षू हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर, दिनकर महाराज अंचवले, रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, कृष्णदेव महाराज काळे, राम महाराज झिंजुर्के, वेणुनाथ महाराज वेताळ, भागवताचार्य महेश व्यास आदी उपस्थित राहणार आहेत.

भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक देविलाल बिहाणी परिवार तसेच संयोजन समितीचे माहेश्‍वरी युवक मंडळ, माहेश्‍वरी महिला मंडळ, जागर ग्रूप, सम्राट सोशल मंचने केले आहे.