शनीच्या चंद्रावर मिथेनची सरोवरे

शनिचा सर्वात मोठा चंद्र ‘टायटन’वर मिथेनची 100 मीटरपेक्षाही खोल पण लहान सरोवरे आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘कॅसिनी’ या अंतराळ यानाने गोळा केलेल्या डाटाचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली. हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘टायटन’ हा शनिचा मोठा चंद्र आहे. आपल्या सौरमालेतील पृथ्वीशिवाय ‘टायटन’ हा असा एक ‘खगोलीय पिंंड’ आहे की तेथे तरल पदार्थ मिळाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या चंद्रावरही पृथ्वीप्रमाणेच ‘हायड्रोलॉजिक’ चक्र चालते. मात्र, यामध्ये मोठा फरक आहे. पृथ्वीवर हे चक्र पाण्याबरोबर चालते. यामध्ये समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यानंतर त्याचे ढगात रूपांतर होते आणि त्यानंतर पाऊस पडतो.

तर हेच चक्र टायटनवर ‘मिथेन आणि इथेन’ने पूर्ण होते. पृथ्वीवर सर्वसामान्यपणे मिथेन आणि इथेनसारख्या ‘हायड्रोकार्बन’ ला गॅस मानले जाते. उच्च दबावामध्ये एखाद्या टँकमध्ये हा गॅस भरला असता तो तरल रूपात बदलू शकतो. तर टायटनवरील तापमान इतके कमी आहे की, मिथेन आणि इथेन हे तेथे तरल रूपातच राहतात. याच तरल वायूंची अनेक सरोवरे शनिवर आहेत. ‘कॅसिनी’ यानाने 2004 मध्ये शनिच्या कक्षेत प्रवेश केला होता. शनिच्या वातावरणात सामावून गेल्यानंतर 2017 मध्ये या अंतराळ यानाचा प्रवास संपला होता.