शनैश्‍चर देवाचे माहात्म्य!

शनि या ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व

हिंदू धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पापग्रह असून, सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर आणि कुंभ या शनि ग्रहाच्या राशी आहेत. शनि तुळ राशीत उच्चीचा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत.

‘ग्रह जेव्हा उच्च राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यासंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. शनि हा ग्रह वायुतत्त्वाचा असून, मनुष्याला आसक्तीकडून विरक्तीकडे नेतो. तो मानवाला जीवनातील मान, अपमान आणि अवहेलना यातून परमार्थाकडे वळवतो. हा पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह आहे.

मानवाच्या गुणदोषांसंदर्भात शनीचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) आणि अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत, पण शनीची फक्त ‘अशुभ’ ही एकच बाजू विचारात घेतली जाते, म्हणूनच लोकांच्या मनात शनीविषयी भीती निर्माण होते. शनि हा ग्रह गर्व, अहंकार आणि पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणुसकी शिकवतो. तो मानवाच्या अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे.

जे शिस्तबद्ध, विनयशील आणि नम्र आहेत, त्यांना तो उच्च पदाला घेऊन जातो, तर जे अहंकारी, गर्विष्ठ आणि स्वार्थी आहेत, त्यांना त्रास देतो. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. या काळात व्यक्तीला आपल्या-परक्याची जाणीव होते, स्वत:चे गुण-दोष लक्षात येतात, गर्वाचे हरण होते आणि अहंकार गळून पडतो, माणुसकीची जाणीव होते, तसेच ‘एक माणूस म्हणून कसे जगावे’ याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळताना दिसतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा