शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा, आरोग्य धोक्यात

मनपाच्या आरोग्य विभागाची स्वच्छतेच्या संदेशांची फक्त जाहिरातबाजीच

अहमदनगर- शहरासह उपनगरी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा संदेश देणार्‍या भिंतीच्या जाहिरातीलगतच मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची स्वच्छतेच्या संदेशांची फक्त जाहिरातबाजीच सुरु असल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या अनेक भागात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसत आहेत. ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत. मुकुंदनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. दिवसंदिवस यामध्ये वाढ होत असून, मनपाकडून हा कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. चिखलमय रस्ता, घाणीच्या दुर्गंधीने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरुन जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. मोठा गाजावाजा करीत स्वच्छतेची मोहिम राबविणार्‍या महापालिकेचे पितळ या भागातील अस्वच्छतेने उघडे पडले आहे. अनेक दिवसापासून साचलेल्या या कचर्‍याच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी मनपाच्या आरोग्य विभागात निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र अद्यापि हा कचरा उचलण्यात आलेला नाही. महापालिकेत दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांची भेट घेऊन सदर प्रश्न सांगितला. मात्र नगरसेवकांनी आचारसंहिता चालू असल्याचे उत्तर देऊन जबाबदारी झटकली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याभागात साथीचे आजार पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे मनपा प्रशासन व स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असून, तातडीने स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.