ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठांचा आधार – प्रदीप पठारे

अहमदनगर- ज्येष्ठ नागरिक संघ हे ज्येष्ठांचे हक्काचे व्यासपीठ आहे. येथील ज्येष्ठांच्या अनुभवाची देवाणघेवाण करून घेतल्यास समाजामध्ये मोठे काम उभे राहू शकते. जुन्या लोकांचा अनुभव हा समाजाला प्रेरणा देणारा असतो. ज्येष्ठांना घरात वेळ घालविणे कठीण जाते. ज्येष्ठ नागरिक संघात आल्यानंतर त्यांचा विरंगुळा होतो. वेळ कसा जातो हे त्यांना कळत नाही. ज्येष्ठ नागरिक संघच ज्येष्ठांचा आधार आहे, असे प्रतिपादन मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, स्टेशन परिसर यांच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त नगर मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यावेळी संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे, उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, रामचंद्र सिन्नरकर, शिवाजीराव ससे, ज्ञानेश्‍वर कविटकर, मीरा महाजनी, श्रीकृष्ण लांडगे, मधुकर वाल्हेकर, विजय लुणे, अशोक आगरकर, जगन्नाथ खिळे, उषा फिरोदिया, बाळकृष्ण पात्रे आदी उपस्थित होते.

श्री. पठारे पुढे म्हणाले की, स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे काम हे तरुणांना लाजविणारे आहे. परिसरात स्वच्छता ठेवण्यात ज्येष्ठांचा खूप मोठा वाटा आहे. याचा आदर्श आपणही घ्यायला हवा. आरोग्यासाठी रोज योग प्राणायाम वर्ग घेणे, संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी दररोज हरिपाठ , देवाचे नामस्मरणे करणे, संस्कृत वाचनाचे धडे देणे हे उपक्रम संघाच्या माध्यमातून राबविले जातात. ही एक कौतुकास्पद बाब आहे. याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे म्हणाले की, स्व. राजाभाऊ झरकर यांनी 16.6.2003 रोजी या संघाची स्थापना केली. आज संघाला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल सुरू आहे. संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेचे दरवर्षी ऑडिट केले जाते. स्त्री पुरुष मिळून 281 सभासद आहेत. त्यापैकी 210 आजीव सभासद आहेत.

धार्मिक कार्यक्रम, आरोग्य विषयक शिबिरे अशा निरनिराळ्या विषयांवर आम्ही सर्वजण एकत्रितरित्या आयोजन करणे. सहलीचे आयोजनही आम्ही करतो. नूतन वर्षानिमित्त रुग्णांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाते. 26 जानेवारीला कोतवाली पोलीस स्टेशनला हजर राहून प्रत्येक पोलीसास पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण लांडगे यांनी केले, आभार उषा फिरोदिया यांनी मानले. यावेळी 80 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना, हरिपाठ, गीता शिकवणे, योगा क्लास घेणे व संघासाठी विशेष सहकार्य करणार्‍या सभासदांचा सन्मान करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा