महिलांच्या उत्कर्षासाठी सावित्रीबाईंचे क्रांतिकारक योगदान – न्यायमूर्ती नेत्राजी कंक

शहरातील महिला वकिलांचा सावित्री ज्योती गौरवाने सन्मान

अहमदनगर- महिलांच्या उत्कर्षासाठी सावित्रीबाईंचे क्रांतिकारक योगदान न विसरता येणार आहे. त्यांनी दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाने महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. अंधारयुगात क्रांतीज्योतीचा उदय होऊन महिलांना दिशा मिळाली. सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेविरोधात लढून बालविवाह, सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह, जातीय विषमता, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बहुमोल कार्य केले आहे. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती नेत्राजी कंक यांनी केले.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ, जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, आधारवड बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त झोपडी कॅन्टीन येथील सुंदरबन हॉलमध्ये शहरातील महिला वकिलांना सावित्री ज्योती गौरवाने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नेत्राजी कंक बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मदाय आयुक्त (न्यायाधीश) गीताजी बनकर, नवीनच न्यायाधीशपदी निवड झालेल्या गीता औटी, भारत सरकारच्या राज्य युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लोंढे, लीगल सेलचे राज्य अध्यक्ष अॅड.प्रशांत साळुंखे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शाखा व्यवस्थापक श्रीनिवास डंके, आर्थिक सल्लागार विनायक नेवसे, कार्यक्रमाचे संयोजक अॅड.महेश शिंदे, अॅड.दिलीप शिंदे, अॅड.अनिता दिघे, अॅड.भानुदास होले, सागर अलचेट्टी, पोपट बनकर, प्राचार्या वंदना शिंदे, आदिती उंडे आदींसह महिला वकिल उपस्थित होत्या.

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीच्या रोपाला पाणी अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

न्यायाधीश श्रीमती गीताजी बनकर यांनी सामाजिक संस्था समाजजागृतीचे चांगले कार्य करीत आहे. समाजपरिवर्तनासाठी व विकासासाठी संस्थांनी कृतिशील उपक्रम राबविण्याची गरज असून, महापुरुषांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शाखा व्यवस्थापक श्रीनिवास लंके यांनी विम्याचे महत्त्व, कार्य, उपयोगिता याबाबत माहिती दिली.

अॅड.प्रशांत साळुंके यांनी फुले दांपत्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी आयुष्यभर कार्य केले. तत्कालीन समाजव्यवस्था बदलविण्यासाठी व शेतकर्‍यांसाठी त्यांनी अविरतपणे लढा दिला. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाज परिवर्तनाचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सौजन्या बोडके या मुलीने सावित्रीबाईंच्या वेशभूषा परिधान करुन सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषण सादर केले. तसेच यावेळी जनवार्ता या सावित्रीबाई फुले विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकावर आस्था सोळसकर या मुलीच्या छायाचित्राला स्थान देण्यात आले असून, तीचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शहरातील 70 महिला वकिलांचा सावित्री ज्योती गौरवाने सन्मानित करण्यात आले. न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ज्येष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ महिला कायमच ताणतणावाखाली कार्य करीत असतात. सावित्रीबाईंच्या नावाने केलेला गौरव प्रेरणा देणारा असून, या सत्काराने भारावलो असल्याची भावना महिला वकिलांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन अॅड.अनिता दिघे व अॅड.प्रणाली चव्हाण यांनी केले. आभार अॅड. भानुदास होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड.गौरी सामलेटी, अॅड.पुष्पा जेजुरकर, रजनीताई ताठे, दिनेश शिंदे, धीरज ससाणे, योगिता देवळालीकर, स्वाती बनकर, विद्या तन्वर, नयना बनकर यांनी परिश्रम घेतले.