नगरमध्ये 11 व 12 जानेवारीला सरगम संगीत महोत्सव 2020

अहमदनगर – सरगमप्रेमी मित्र मंडळाने 11 आणि 12 जानेवारी या दोन दिवसांचा सरगम संगीत महोत्सव – 2020 सावेडीमधील माऊली सभागृहामध्ये आयोजीत केलेला आहे. दोन्हीही दिवशी संध्याकाळी 6.0 ते 9.0 या वेळात या संगीत सभा होतील.

आंतरराष्ट्रीय कलाकार, उभरते कलाकार तसेच स्थानिक कलाकारांना घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्यांनी अनेक ख्यातनाम कलाकार घडवले, अशा गुरुवर्य कै.पं.शांतारामबुवा चिगरी गुरुजींना समर्पित असलेल्या या महोत्सवाची सुरुवात गुरुजींच्याच परंपरेत घडलेल्या लाडक्या नगरकन्या नंदिनी आणि अंजली गायकवाड यांच्या शास्त्रीय गायनाच्या जुगलबंदीने होणार आहे. त्यांना नगरचे ख्यातनाम संवादिनी वादक मकरंद खरवंडीकर संवादिनीवर, तर चिगरी गुरुजींच्या गुरुपरंपरेत तयार झालेला तेजस धुमाळ तबला संगत करणार आहेत.

दुसर्‍या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरी वादक पं.रोणू मुजुमदार हे प्रथमच नगरमध्ये आपली सेवा पेश करणार आहेत. त्यांना तबला संगत पं.चिगरी गुरुजींचे पट्टशिष्य पं.मुकेश जाधव यांची असेल.

दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त तबला वादक यशवंत वैष्णव यांचे स्वतंत्र तबला वादन होईल. त्यांना संवादिनीवर नगमा संगत श्री.निलय साळवी करतील.

महोत्सवाचा समारोप मुंबईचे उभरते कलाकार आदित्य मोडक यांच्या गायनाने होईल. पं.चिगरी गुरुजींचे लाडके शिष्य अंगद गायकवाड त्यांना संवादिनी संगत करतील, तर तबला संगत यशवंत वैष्णव यांची असणार आहे.

दोन्हीही दिवसांच्या संगीत सभेसाठीचा प्रवेश सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. लोकमान्य मल्टीपर्पज, शिवरंजन संगीतालय, जरीवाला, नमोह टूर्स, रामकृष्ण अर्बन आदि उद्योग समुहांकडून या संगीत सभेसाठी अर्थसहाय्य लाभले आहे.

सर्व रसिकांनी उपस्थित राहून मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राम ज. शिंदे यांनी केले आहे.