वादविवाद स्पर्धेत पारितोषिक मिळविणारे स्पर्धक महाराष्ट्रात नावारुपास येतात – प्रा. शिरिष मोडक

सारडा महाविद्यालयाच्या शारदा व ज्ञानेश्‍वर वाद स्पर्धेस विविध जिल्ह्यातून प्रतिसाद

अहमदनगर- पेमराज सारडा महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केलेल्या वाद-विवाद स्पर्धांच्या माध्यमातून अनेक ज्वलंत, महत्वपूर्ण विषय हाताळले जात आहेत. सहभागी विद्यार्थ्यांचे कौशल्य पणास लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक ज्ञानात भर पडत आहे. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजू उत्तमप्रकारे मांडली जात असल्याने या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल. या वाद-विवाद स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता येते. या स्पर्धेत पारितोषिके मिळविणारे स्पर्धक भविष्यात महाराष्ट्रात नावारुपास येतात. सारडा महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी केले.

पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शारदा व ज्ञानेश्‍वर करंडक वाद स्पर्धेचे उद्घाटन प्रा. शिरिष मोडक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष व सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, उपाध्यक्ष मकरंद खेर, अॅड. सुधीर झरकर, माजी कार्याध्यक्ष राजेंद्र चोपडा, ज्योती कुलकर्णी, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, डी.आर.जाधव, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षिका डॉ. मंगला भोसले, स्पर्धा निमंत्रक डॉ. रत्ना वाघमारे, प्रा. शत्रुध्न लाड आदिंसह नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जालना जिल्ह्यातून आलेले स्पर्धक उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना देण्यात येणार्‍या रजत करंडकांचे पूजनही झाले. शारदा करंडकसाठी प्रा. डॉ. संदिप सांगळे व श्याम शिंदे यांनी परिक्षण केले तर ज्ञानेश्‍वर करंडक स्पर्धेसाठी बापू चंदनशिवे व डॉ.ओंकार रसाळ यांनी परिक्षण केले.

यावेळी बोलतांना राजेंद्र चोपडा म्हणाले, 15 वर्ष मी हिंद सेवा मंडळाचा पदाधिकारी व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याकाळी सारडा महाविद्यालयात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. शारदा व ज्ञानेश्‍वर वाद स्पर्धा बंद पडली होती. त्याकाळी पुढाकार घेऊन पुन्हा ही स्पर्धा सुरु केली आता अखंडीतपणे ही स्पर्धा चालू असल्याचे पाहून आनंद वाटत आहे. सारडा महाविद्यालयात होत असलेले बदल व मिळणार्‍या आधुनिक सुविधा पाहून समाधान वाटत आहे.

प्रास्तविक डॉ. रत्ना वाघमारे यांनी केले, उपप्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले तर प्रा.शत्रुघ्न लाड यांनी आभार मानले.