‘लेक वाचवा लेक शिकवा’ हा मंत्र जपण्याची गरज – प्रा. शिरीष मोडक

सारडा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

अहमदनगर- सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पूर्वी महिला चूल आणि मूल या बंधनात होत्या परंतु आज सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या अभूतपूर्व अशा कार्यांमुळेच आज मुली शिकत आहेत. राजकारण, समाजकारण, संस्कृती, अर्थव्यवस्था अशा समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांची उल्लेखनीय कामगिरी आहे. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. तरीही आपली जबाबदारी संपलेली नाही. समाजाने ’’लेक वाचवा लेक शिकवा’’ हा मन्त्र जपण्याची गरज आहे असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष व वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, उपकार्याध्यक्ष डॉ. पारस कोठारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. आर. जाधव, पर्यवेक्षिका डॉ. मंगला भोसले, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी संस्था) प्रकल्प अधिकारी विजय पठारे, सविता सकट, स्नेहल बोबडे, शुभदा टेपाले, अॅड. विशाल गायकवाड, अतुल सोनवणे, दत्तात्रय हराळ, मनीषा फराटे आदी उपस्थित होते.

सारथी संस्थेच्या सविता सकट, स्नेहल बोबडे, शुभदा टेपाले यांनी ‘आम्ही लेकी आहीले’ च्या ओव्या गाऊन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कृष्णा पाटील यांनी केले तर आभार प्रा.मंगेश भुते यांनी मानले.