पोलिसांना धक्काबुक्की करून समद खान पसार

अहमदनगर – गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त शहरबंदी असलेला समदखान वहाबखान हा शासनाचे आदेश झुगारून शहरात फिरताना पोलिसांना आढळुन आला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना धक्काबुक्की करून दुचाकीवरून तो पसार झाला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर शहरासह सर्वत्र गणेशोत्सव व मोहरम सण सुरू आहेत. या काळात नगर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन नगरसेवक समदखान वहाबखान याला शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी व नगर तालुका या पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन गणेशोत्सव पुर्ण होईपर्यंत तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही समदखान याने शासकीय आदेश झुगारून शहरात प्रवेश केला. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बेंडकुळे व इतर कर्मचार्‍यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की करून दुचाकीवरून राजरोसपणे पसार झाला.

याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी पो.कॉ. अजय नगरे याच्या फिर्यादीवरून भादंविक 353, 188, 109 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास स.पो.नि.पाटील हे करीत आहेत.