साकळाईसाठी नगरमध्ये उपोषण सुरु

अहमदनगर – बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी क्रांती दिनी शुक्रवारी (दि.9) सकाळपासून शेकडो ग्रामस्थांसह जिल्हा परिषद आवारात आमरण उपोषण चालू केले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा, नगर तालुक्यातील 35 गावांना लाभदायक ठरणारी साकळाई उपसा सिंचन योजना फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरती ठरविली आहे. या योजनेवर राजकारण करून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. मात्र गेल्या 25 वर्षांपासून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. आता गेल्या काही वर्षांपासून साकळाई चा विषय निघाला की निवडणुका जवळ आल्या वाटते, अशी चेष्टा होवू लागली आहे.

मात्र गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी याबाबत पाठपुरावा सुरु केलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या योजनेबाबत दीपाली सय्यद यांना आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीअगोदर या योजनेचे काम चालू होईल, असे सांगितले होते. त्यामुळे सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता. मात्र निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. सरकारकडून या योजनेबाबत वेगवेगळी विधाने आल्यानंतर पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी यासाठी लढा तीव्र केला आहे. महिना भरापूर्वी त्यांनी या योजनेसाठी क्रांतिदिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या योजनेखाली येणार्‍या 35 गावांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती सभा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

यापूर्वी जाहीर केल्यानुसार दिपाली सय्यद यांनी शुक्रवारी (दि.9) सकाळपासून जिल्हा परिषद आवारात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला विविध गावांतील ग्रामस्थ, विविध संस्था, संघटना, यांनी पाठींबा जाहीर केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा