सज्जनगडची आंग्लाई देवी

सध्या या गडास ‘अस्वलगड’ व ‘परळीगड’ अशी ओळख आहे. बहामनी सत्तेच्या उतरत्या कालखंडात गडाचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे आला, त्यावेळी याचे नाव ‘नवरसतारा’ होते. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून हा गड जिंकला. रामदास स्वामींच्या या गडावरील कायमच्या वास्तव्याने यास ‘सज्जनगड’ असे संबोधण्यात येऊ लागले. जून १७०० मध्ये गडाचा ताबा औरंगजेबाकडे आल्यावर त्याने परत ‘नवरसतारा’ अर्थात ‘नौरसतारा’ असे नाव ठेवले. सध्या गडावरील रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाया भाविकांची संख्या जास्त आहे.

सज्जनगडाच्या दुर्गअवशेषांत प्रवेशद्वार, रामघळ, शिवाजी महाराज राजद्वार, पर्शियन शिलालेख, आदिलशाही शिलालेख, घोडाळे तळे, मशीद, वास्तू, श्रीदेवी आंग्लाई मंदिर, कबरी, बुरूज, तटबंदी, राम मंदिर, समर्थ रामदास स्वामी समाधी व महत्त्वाच्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे. गडावरील मशिदीच्या समोरच्या बाजूस आंग्लाई देवीचे मंदिर आहे. समर्थांना अंगापूर डोहात दोन मूर्ती सापडल्या. यांपैकी सूर्यनारायणाच्या मूर्तीची त्यांनी चाफळ येथे श्रीराम मूर्ती म्हणून स्थापना केली व श्री आंग्लाई देवीच्या मूर्तीचीही स्थापना केली. शिवकाल व पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा जपणारी आंग्लाई देवीचं स्थान हे अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे.

ऐतिहासिक संदर्भानुसार गडावर समर्थ वास्तव्यास आल्यानंतर शिवरायांनी २००० होन खर्चून एक मठ बांधून घेतला. इब्राहिम आदिलशहाने या गडाचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यामागील कारण सांगताना साकी मुस्तैदखान लिहितो की, ‘‘तो प्रत्येक नवीन गोष्टीला ‘नवरस’ हे नाव देत असे. उदाहरणार्थ नवरसनामा, नवरसपूर गाव आणि नवरस नाणे. त्यास अनुसरून किल्ल्याचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यात आले.’’ ऐतिहासिक संदर्भात ७ मे १७०० मध्ये औरंगजेबाने गडाखालील मोर्चाची पाहणी केली. बाणदारांना बाण किल्ल्यात फेकण्यास सांगितले. दोन दारूचे बाण किल्ल्याच्या दिशेने सोडण्यात आले.

३१ मे फतेहुल्लेखानाने लिहून पाठवले की, ‘‘मी पगाराचे वाटप केले. उद्या मी हल्ला करणार आहे. त्यासाठी शिड्या तयार केल्या आहेत. मला धनुष्य व बाणांचे भाते देण्यात यावेत.’’ गडावरील औरंगजेबाचा वाढता हल्ला लक्षात घेऊन परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी व उद्धव गोसावी यांनी गडावरील पूजनीय मूर्ती घेऊन गड सोडला व त्या वासोटा किल्ल्यावर ठेवल्या. १३ जून १७०० रोजी गडावर विजय मिळवल्यानंतर औरंगजेब डोक्याला शिरपेच बांधून किल्ला पाहण्यास गेला व गडावरील सर्व नवी मंदिरे जमीनदोस्त करण्याचा त्याने हुकूम अंमलात आणला गेला. परशुराम त्र्यंबक प्रतिनिधींनी मुघलांच्या ताब्यातून पुनश्च गड जिंकल्यावर वासोट्यावर नेऊन ठेवलेल्या देवमूर्ती पुन्हा सज्जनगडावर आणल्या व त्यांची प्रतिष्ठापना केली. यानंतर येथील मंदिरांची पुर्नबांधणी व डागडुजी करण्यात आली.