संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्‍वरभक्ती दर्शवणारे नि भावविभोर करणारे अभंग!

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे.

एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोव‍-यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोव-या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले.

त्यांनी ‘तुमच्या गोव-या कशा ओळखायच्या?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले, ‘ज्या गोवरीतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू येईल, ती माझी!’ त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोव-या लावल्या तेव्हा खरंच संत जनाबाईंच्या गोव-यांतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू आला. आपला नामजप कुठच्या प्रतीचा असला पाहिजे, याची कल्पना या उदाहरणावरून लक्षात येईल.

संत जनाबाईचे अनुमाने ३५० अभंग ‘सकल संत गाथा’ या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्‍चंद्राख्यान नामक आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहे.

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥

पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥

ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥

जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥

भावार्थ : भक्त जना झाडलोट करते. केर मात्र श्रीकृष्ण भरतो. डोक्यावर टोपली घेऊन तो केर दुसरीकडे टाकून येतो. केवळ भक्तीचा भुकेला असलेला हा श्रीहरि हीन कामेही करू लागला. जनाबाई विठोबाला म्हणते, ‘कशी होऊ रे मी तुझी उतराई!’ (देव भावाचा भुकेला असल्याची अनुभूती या अभंगातून येते.)

वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥

चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥२॥

माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥३॥

सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

भावार्थ : उजवी आणि डावी दोन्हीकडे मला कृष्णाची रूपे दिसतात. सर्व चराचरामध्ये भगवंत दिसतो. त्यामुळे अविद्या म्हणजे अज्ञान राहत नाही. माझे ‘मी’पणच मला आठवत नाही. तेथे द्वैतभाव कसा येईल! (संत नामदेवाची) दासी जनी आपल्या डोळ्यांनी सर्वांमध्ये सर्व कलांनी युक्त अशा श्रीकृष्णाला पाहते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा