साहित्य सहवास – ‘थेंबे, थेबे…’

मे महिन्यातला रविवार. कॉलनीत पाण्याचा टँकर येण्यापूर्वीच तासभर आधी हंडे, ड्रम, कळश्यांचे नंबर्स लागलेले. रणरणतं ऊन. भर दुपार. अंगाची लाहीलाही होत आहे. पाण्याचा टँकर आला. ड्रायव्हरने स्वतः शिस्तीने, पाण्याचा थेंबही वाया न घालता प्रत्येकाला पाणी दिलं. सगळे आनंदी झाले कारण थेंबे थेंबे… त्याचवेळी दुसर्‍या कॉलनीत पाण्याचा टँकर आला. कॉलनीतल्या सगळेच हंडे, कळशा, ड्रम घेऊन टँकरभोवती जमले. अनेकांनी पाईप आणले. पाण्याच्या टाकीवर उभे राहणार्‍यांमध्ये आणि खाली पाणी भरणार्‍यांमध्ये भांडण, मारामारी. अनेक लिटर पाणी वाया गेलं. टँकरवाला रागाने टँकर घेऊन निघुन गेला.

एका आजीला एका भल्या माणसानं स्वत:च्या ड्रममधील हंडाभर पाणी दिलं. आजीचा चेहरा आनंदी दिसु लागला कारण थेंबे, थेंबे. घटना त्याच गावातली, जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यातली. पाऊस जोरदार पडु लागला. आता मात्र एकानंही पावसाचं पाणी भरुन ठेवलं नाही कारण घराच्या भोवताली, रस्त्यावर पाणीच पाणी. एका घराच्या बाहेर काही माणसं झाडाखाली, पाऊस पडत असतांना उभी होती.

एकजण म्हणाला की मे महिन्यात पाणी नव्हतं. आता पाणीच पाणी… दुसरा एकजण म्हणाला जवळ जे मुबलक असतं त्याचं महत्व आपल्याला नसतं. खरंतर पावसाचं पाणी अडवलं पाहिजे, जिरवल पाहिजे. पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब जपलाच पाहिजे. आत्ता ह्याक्षणी आपल्या भोवताली पाणीच पाणी पण हेच पाणी वाया गेलं तर परत पुढच्या मे महिन्यात टँकरचं पाणी घ्यावं लागणार. उभ्या असलेल्या सगळ्यांना त्या माणसाचं म्हणनं योग्य वाटलं. जो तो पावसात भिजत घरी आला. घरातले हंडे, कळशा, टूममध्ये पाणी भरुन ठेवलं शिवाय घरातल्या सगळ्यांना बोलावून घेऊन सांगितलं की घराजवळच्या मोकळ्या जागेत आपण खड्डा खणु. त्यात पाणी जिरवू, साठवु. सलग काही तास पडलेला पाऊस थांबला.

साधारण 3 दिवसांनंतर त्या एका कुटुंबानं घराजवळ खड्डा खणला. दोन दिवसांनी पाऊस पडला, खड्डा पाण्याने भरला. इतरांनी ते पाहिलं. त्यांनीही तसाच प्रयोग केला. पावसाचे पाणी खर्‍या अर्थाने उपयोगात आणलं. खरंतर थेंब म्हणजे अगदीच क्षुल्लक ह्या अर्थानं आपण त्या थेंबाकडं पाहातो पण थेंबाकडं जो महत्वपूर्ण थेंब म्हणुन पाहातो तो पाणी जपुनच वापरतो. थेंब न् थेंब योग्य उपयोगात आणतोच. पावसाचा थेंब थेंब उपयोगात आणणार्‍या व्यक्तींची आज आणि उद्याही गरज आहेच. तीस-पस्तीच वर्षांपूर्वी वाटलं नव्हतं एक लिटर पाणी वीस ते तीस रुपयांना घ्यावं लागणार.

आज ते घ्यावं लागतंय तर मग भविष्यकाळात दोनशे रुपये लिटरने पाणी घ्यावं लागेल जर आपण पावसाचं पाणी अडवलं नाही, जिरवलं नाही तर. अनेकांकडे प्रचंड पैसा आहे ते म्हणतील दोनशे रुपये लिटरनं आम्ही पाणी घेऊ. घ्याल. तुम्ही नक्कीच घ्याल पण पाण्याचा थेंब न् थेंब योग्य उपयोगात आणला तर ही वेळ येणार नाही ह्याची काळजी घ्यायला शिका. तुमच्याकडे असणारा प्रचंड स्वरुपातला पैसा, पै-पै करुनच साठवलाना पै-पै म्हणजेच थेंबे, थेंबे… म्हणजेच पै-पैचं महत्व तसंच थेंबे, थेंबेचं महत्व. गाव, वाडी, शहर टँकरमुक्त करायचं असेल तर थेंबे,थेंबे तळेसाचे हे फक्त म्हणायचं नाही तर थेंबन् थेंब उपयोगात आणायचा, साठवायचा, जपायचा आणि दुसर्‍यांनाही हे असं करायला भाग पाडायचं कारण थेंबे, थेंबे. थेंबे, थेंबे हे दोनच शब्द पण जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणारे, जगण्याचं मोल सांगणारे, बरोबर ना?

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार, अ.नगर.

मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा