साहित्य सहवास – ‘जयंती’

अनेक वर्षांपूर्वीची घटना. एका राष्ट्रपुरुषाची जयंती. साधारण हजारभर लोकसंख्या असणार्‍या त्या खेडेगावातल्या प्रत्येकानं वर्गणी दिली. राष्ट्रपुरुषाच्या जयंतीदिनी अगदी सकाळीच गावातला प्रत्येकजण मंदिराजवळच्या पारावर आला. गावातल्या एका दाम्पत्याच्या हस्ते राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. प्रत्येकानं अभिवादन केलं. गावातल्या शिक्षक असणार्‍या व्यक्तीने त्या राष्ट्रपुरुषाविषयी, त्यांच्या कार्याविषयी सविस्तर सांगितलं. अगदी लहान मुलंसुध्दा काळजीपूर्वक ऐकत होते.

शहरातली काही कलाकार मंडळी गावात आली. त्या कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. राष्ट्रपुरुषाच्या जीवनातील अनेक घटना, त्या कलाकारांनी सादर केल्या. शिक्षकांनी राष्ट्रपुरुषाविषयी सांगितलेलं जेवढं प्रत्येकाला मनापासुन आपलसं वाटलं त्यापेक्षाही अधिक या नाट्यमय घटनांनी, त्या राष्ट्रपुरुषाचा जीवनपट मनात घर करुन बसला. सामान्य माणसातच असामान्यत्व असतं हे प्रत्येकाच्या लक्षात आलं. समाजासाठी प्रत्येकानं योगदान दिलंच पाहिजे याची प्रत्येकाला जाणीव झाली.

शहरातल्या कलाकारांपैकी एक ज्येष्ठ कलाकार म्हणाला की, आपला अवघा जन्म समाज, राष्ट्राच्या हितासाठी सत्कारणी लावणारांचीच जयंती साजरी केली जाते. जयंती साजरी करायची म्हणजेच त्या राष्ट्रपुरुषाच्या आदर्श आचार, विचारांचा अंगिकार करायचा. त्यांच्याविषयी वाचायचं. त्यांच्याविषयीच्या वाचनामुळंच आपल्याला अधिकाधिक माहिती मिळते. आम्ही तर या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचं सादरीकरण केलं.

खरं तर तुम्ही ठरवलं असतं तर, राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करुन जयंती साजरी करु शकला असता. अवघ्या गावानं वर्गणी जमा करुन, राष्ट्रपुरुषाविषयीच्या जीवनातील घटना पाहुन, ऐकुन, त्यांच्या मार्गावर चालण्याची शपथ घेऊन तुम्ही जयंती साजरी केली. खरं तर हा आदर्श अनेक गावांनी घ्यायलाच पाहिजे.

जयंतीदिनी राष्ट्रपुरुषाच्या कार्याचं स्मरण करुन तुमच्यात स्फुर्ती निर्माण झाली म्हणजेच तुम्ही समाज विधायक कार्याला सुरुवात केलीय. समाजाला चांगलं देण्यासाठी जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हाच समाज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतो हे तुम्ही दाखवुन दिलंत. आपल्या जन्माचं प्रयोजन काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मी, समाजाचा घटक असुन समाजाच्या हिताचं कार्य, कृती मी केलीच पाहिजे.

तुमच्या गावाची हिच एकी, गावाचं भलं करणारच. हिच एकी समाजाचं आरोग्य चांगलं राखते. या जयंती निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी गाव स्वच्छ केलं हे ऐकलं, खरंच खूपच चांगलं काम केलंत तुम्ही. गाव स्वच्छ म्हणजेच चांगलं आरोग्य, म्हणजेच सशक्त मन. तुम्ही नक्कीच भविष्यात खुप चांगली कामं करुन गावाचं, समाजाचं भलं कराल आणि तुमचा जन्म सार्थकी लावाल असं मला मनापासून वाटतं. टाळ्यांच्या कडकडानं गाव प्रसन्न झालं.

आज राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी केली जाते. अगदी मोजकी मंडळी त्या खेडेगावा प्रमाणे जयंती साजरी करतात बाकीची मंडळी जयंती कशी साजरी करत आहे आपण पाहातोच. खरं तर जयंती हे एक अत्यंत चांगलं असं निमित्त आहे समाज एकसंध होण्याचं, राष्ट्रपुरुषांचे आचार-विचार अंगिकारण्याचं, समाजाप्रति स्नेहभाव वाढण्याचं.

 सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार

अ.नगर., मो. 9822758383