प्रजासत्ताक दिनी ‘सुहाना सफर वुईथ अन्नू कपूर’ कार्यक्रम

जैन इंटरनॅशनल ट्रेड आयोजित महाट्रेड फेअरला उदंड प्रतिसाद

अहमदनगर – नगरमध्ये जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)च्यावतीने आयोजित जितो महाट्रेड फेअर 2019 ला पहिल्याच दिवशी नगरकरांनी तुडुंब गर्दी केली. गुरूवारी सकाळी उदघाटनानंतर नगरकरांचा ओघ प्रदर्शनाकडे सुरू झाला. केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटसमोरील 10 एकराच्या विस्तीर्ण प्रांगणात जवळपास 350 हून अधिक आस्थापनांचे स्टॉल्स असून नगरकरांसह जिल्ह्यातील नागरिक सहकुटुंब प्रदर्शनाला भेट देत आहेत. व्यापार, उद्योग, शिक्षण, व्यवसायाच्या नव्या संधी शोधताना सर्वजण येथे शॉपिंगचाही आनंद घेत आहेत. याशिवाय तज्ज्ञांच्या चर्चासत्रातून उज्वल भविष्याचे विचारमंथनही होत आहे. याठिकाणी मनोरंजनाचीही रेलचेल आहे. याठिकाणी दि.25 रोजी रात्री 8 वाजता भव्य म्युझिकल शो होणार आहे. यात स्थानिक कलाकार बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यासह प्रजासत्ताक दिनी दि.26 रोजी सायंकाळी 7 वाजता सुहाना सफर वुईथ अन्नू कपूर हा फिल्मी दुनियेवर आधारित संस्मरणीय कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नगरकरांना प्रजासत्ताक दिनी प्रगतीच्या वाटा धुंडाळतानाच भारतीय सिनेमा जगताच्या प्रवासाची गीतसंगीतमय मेजवानीही मिळणार आहे.

राज्यातील, देशातील आस्थापना, शिक्षण संस्था, उद्योजक, व्यावसायिकांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले आहे. विविध मान्यवरांच्या संवादात्मक चर्चासत्रातूनही सर्वांना विशेष मार्गदर्शन मिळत आहे. या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठी, नवनवीन उत्पादने पाहण्यासाठी गर्दी होत आहे. नवीन व्यावसायिकांना विविध उत्पादनांच्या फ्रँचाईसीची माहिती देणार्‍या स्टॉल्सला भेट देणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय महिला उद्योगाशी संबंधित स्टॉल्सलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. नगरमधील तसेच राज्यात अनेक ब्रॅण्डसचे स्टॉल या प्रदर्शनात आहेत. दि.28 जानेवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नगरला विकासाच्या दिशेने नेणार्‍या या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन जितो अहमदनगरचे अध्यक्ष गौतम मुनोत, सेक्रेटरी अमित मुथा व महाट्रेड फेअरचे प्रोजेक्ट चेअरमन जवाहर मुथा यांनी केले आहे.

विश्वविक्रमी राष्ट्रध्वज साकारणार प्रजासत्ताक दिनी भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्याचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यात नगरमधील सर्व वयोगटातील नागरिक, विविध क्षेत्रातील संस्था,शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 12 तासांत 1100 स्क्वेअर फूटाचा राष्ट्रध्वज तयार करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत नागरिकांना या विश्वविक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या विश्वविक्रमामुळे अहमदनगरचे नाव संपूर्ण विश्वात उंचवणार असून एवढ्या मोठ्या संख्येत लोक एकत्र येऊन विश्वविक्रम करण्याचा दुर्मिळ योग असणार आहे. या उपक्रमात आपल्या मुलांसोबत नगरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन जितो अमित मुथा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अमित मुथा, मो. 9822048408.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा