सर्पदंश झालेल्या बालिकेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू

‘सिव्हिल’ च्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर- सर्पदंश झालेल्या साडेचार वर्षीय बालिकेस औषधोपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन घेण्यास डॉक्टरांनी टाळाटाळ करुन हलगर्जीपणा केला. यामुळे वेळीस औषधोपचार न मिळाल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.12) सकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अनिल शंकर राठोड (रा.कन्नड) हे ऊसतोडणी कामगार उसतोडणीकरीता राहुरी तालुक्यातील जांभळी परिसरातील वावरथ येथे आलेल्या असताना पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी अक्षरा अनिल राठोड (वय साडेचार वर्षे) हिला झोपेतच विषारी सर्पाने दंश केला. सर्पाने दंश केला असल्याचे लक्षात येताच तिच्या पालकाने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता आणले. परंतु येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलीस रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला व सदर मुलीच्या पालकांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नाईलाजाने मुलीच्या नातेवाईकाने रात्री शहरातील अनेक खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु तिला कोणत्याही खासगी रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने पुन्हा नातेवाईक मुलीला घेऊन पुन्हा सिव्हील हॉस्पिटलला आले. तरीही डॉक्टरांनी त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्यांना उपचाराकरीता बोलावले तोपर्यंत वेळ निघुन गेली होती. सदर बालिकेचा औषधोपचाराअभावी मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलीस मृत घोषीत केले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून प्राथमिक तपास हे.कॉ. लबडे हे करीत आहेत.

अक्षरा हिस वेळेवर औषधोपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता परंतु जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अॅडमिट करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यांच्या या हलगर्जीपणामुळेच अक्षरा हिचा मृत्यू झाला असा आरोप अक्षरा हिच्या नातेवाईकांनी यावेळी बोलताना केला.