रेल्वे उड्डानपुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष प्रशासनाला आणखी किती बळी हवेत?

पर्यायी व्यवस्थेमुळे वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यताही वाढली

अहमदनगर- महिनाभरापुर्वी झालेल्या भीषण अपघातात केडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचा तुटलेल्या कठड्याची बांधकाम विभागाने अद्यापही दुरुस्ती केलेली नाही. तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणी लोखंडी बॅरीकेटस् लावून प्रशासनाने तात्पुरता पर्याय शोधला आहे. परंतु, त्यामुळे वाहतुकीस अडथळ्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढला आहे. बस-ट्रक अपघातात दोघांचा बळी गेला होता. आता कठड्याच्या दुरुस्तीकडे डोळेझाक करुन प्रशासन या पुलावर आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल नागरिक, वाहनचालकांनी केला आहे.

नगर शहरातून पुण्याकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग हा रेल्वे उड्डाणपुल आहे. अरुंद असलेला हा उड्डाणपूल अतिशय कमकुवत झालेला आहे. अनेक वर्षांपासून या पुलाची कुठल्याही प्रकारची देखभाल-दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आजवर या पुलावर अनेक अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. पुलाचे कठडे ही कमकुवत झालेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच या पुलावर बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. याच अपघातात कमकुवत झालेल्या पूलाच्या कठड्यावरून एक मोटारसायकल स्वार खाली पडून गंभीर जखमी झाला होता. हा अपघात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे तरी देखील तुटलेल्या कठड्याची कसलीही दुरूस्ती अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेली नाही. तुटलेल्या कठड्यांच्या ठिकाणी तात्पुरते बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. तेही धोकादायक स्थितीत लावलेले आहेत. या तुटलेल्या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास याच ठिकाणी पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत मागील आठवड्यात केडगाव येथील वैभव कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. मिसाळ यांना निवेदन देत उड्डाणपुलावरील तुटलेल्या कठड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ आदेश द्यावेत. अशी मागणी केली होती. त्यानंतर फक्त एक दिवस थातूर मातुर काम केले गेले पण पुन्हा ते तसेच पडले आहे.