खाजगी व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचार्‍यांच्या वेतनाला टाच

नियमानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन


अहमदनगर – महाराष्ट्रातील अनेक खाजगी व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची वेतन कपात तर वेतन दिले जात नसल्याने आपातस्थितीत सदर शिक्षक व कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे व उपाध्यक्ष प्रकाशचंन्द्र मिश्रा यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिका व लगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार यासारख्या क्षेत्रात आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक खाजगी, कायम विनाअनुदानित शाळा आहेत. सर्व बोर्डाच्या या शाळांमध्ये हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे.

काही शैक्षणिक संस्थांनी मार्च महिन्याचे कर्मचार्‍यांचे वेतन अद्यापी अदा केलेले नाही. तसेच एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन देता येणार नाही असेही कळवले आहे. यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचा विपरीत अर्थ काढला जात आहे. वस्तुतः शासनाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार पालकांची मागणी रास्तच आहे. याबाबत दुमत नाही. मात्र बहुतांश खाजगी, विनाअनुदानित संस्था शैक्षणिक फीची निर्धारित रक्कम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस किंवा सत्राच्या सुरुवातीला घेतात. तरी फी वसुली होत नसल्याचे कारण पुढे करून सदरील शिक्षक व शिक्षकेतरांना वेतन देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. अथवा अत्यल्प वेतन देत आहे. वस्तुतः काही विनाअनुदानित शाळेतील कर्मचार्‍यांचे  वेतन अतिशय अल्प आहे. ते नियमानुसार ही दिले जात नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. सदर वेतनाबाबत अनेक तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत.

या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खाजगी, विनाअनुदानित शाळांमधील कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत योग्य तो निर्णय घेऊन शासनातर्फे योग्य ते निर्देश निर्गमीत करुन खाजगी,विनाअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिलासा देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा