‘पति’ ने ओढली रेल्वे

काहीवेळा आपल्या आवडत्या लोकांना खूश करण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लूप्त्या लढवल्या जातात. कधी कधी त्या यशस्वी आणि अयशस्वीही होतात. त्यांच्या प्रयत्नांना मात्र दाद दिलीच पाहिजे. अशाच प्रकारचा प्रयत्न इवॉन सैकिन या 34 वर्षीय तरुणाने केला आणि त्याचा हा प्रयत्न चक्क विश्‍वविक्रम म्हणून नोंदविला गेला. मात्र, यासाठी तो वर्षभरापासून तयारी करत होता, हे विशेष.

34 वर्षीय इवॉन सैकिनेने ब्लादिवोस्तोक शहरात तब्बल 218 टन वजन असलेली रेल्वे ओढली. रशियात ‘ह्यूमन माउंटन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, मी माझे लक्ष्य पार करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करत होतो. शेवटी माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. इवॉनने आपल्या पत्नीला इंप्रेस करण्यासाठी रेल्वे ओढण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी तो रोज कठोर परिश्रमही करत होता. यामध्ये त्याला यश तर आलेच, याशिवाय त्याचे नावे नव्या विश्‍वविक्रमाचीही नोंद झाली. आता त्याचे पुढील लक्ष्य 12 हजार टन जहाज ओढण्याचे.

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही रेल्वे इंजिन, जहाज आणि विमाने ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, 218 टन वजन केवळ मसल्स पॉवरच्या मदतीने ओढण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न होता. यामुळेच ही कामगिरी अचाट असल्याचे मानले गेले पाहिजे. दरम्यान, यापूर्वी मलेशियातील क्वालालंपूर रेल्वेस्थानकावर 18 ऑक्टोबर 2003 रोजी वेलू रथकृष्णन याने दातांच्या मदतीने 260.8 टन वजनी रेल्वे 4.2 मीटरपर्यंत ओढली होती.