गॅस भरताना पेट्रोल पंपावर गॅस गळती; अनर्थ टळला

अहमदनगर- एलपीजी गॅस रिक्षात भरताना गॅस गळती झाल्याची घटना सोमवारी (दि.22) सकाळी देशमुख पेट्रोलपंप (रंगोली हॉटेल शेजारी, केडगाव) येथे घडली. मात्र वेळेवर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10 च्या सुमारास देशमुख पेट्रोलपंपावर एका रिक्षामध्ये एलपीजी गॅस भरणे चालु होते. त्यावेळी गॅस भरणारा कर्मचारीच मोबाईलवर बोलण्यात दंग होता. त्यामुळे रिक्षा चालकास गॅस भरणे झाले आहे, असे वाटल्याने त्याने रिक्षा सुरू करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस भरणे चालु असल्याने पाईप रिक्षामध्ये होता. रिक्षा जोरात पुढे गेल्याने व पाईप रिक्षामध्ये अडकल्याने गॅस भरण्याची मशिनच ओढली गेली व पाईप जागेवर उखडला गेला. त्यामुळे गॅसचा फवारा 7 ते 8 फुट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेने पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकात घबराहट पसरून मोठी धावपळ झाली. पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या धाडसाने गॅस टाकीच मेन गॅस कनेक्शन बंद केले. व त्याचबरोबर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी मोबाईल चालु करा व आग भडकेल असे कोणतेही कृत्य करू नका, असे सांगितले.

या काळात खुप गॅस लिक झाल्याने परिसरात गॅस पसरला होता. तो गॅस पुर्णपणे हवेमध्ये विरघळला न गेल्याने बराचवेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. यावेळी काही नागरिकांनी मोबाईलमध्ये शुटींग व फोटो काढले. मात्र ते धोक्याचे असल्याचे अग्निशमन दलाचे जवान नागरिकांना समजावत असल्याचे दिसत होते. त्यांनी व परिसरातील नागरिकांनी यावेळी परिसरात वाहने थांबू न देता पुढे सरकवण्याची विनंती प्रवाशांना बराचवेळ करत असल्याचे दिसुन आले.

अग्निशमन दलाचे जवान आरिफ इनामदार, शिवाजी कदम, अशोक काळे व रामदास औटी यांनी यावेळी अथक परिश्रम करून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा गॅस लिकेजमुळे तो गॅस पेटणार नाही, याची काळजी घेतली.

पेट्रोल पंपावर नेहमीच नियमांची पायमल्ली होताना दिसते. पेट्रोल व गॅस हे ज्वलनशिल पदार्थ असल्याने पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास तसेच सिगारेट व बिडी पेटविण्यास मनाई असतानाही वाहनचालकांसह पेट्रोल पंप कर्मचारी सुध्दा बर्‍याचवेळा मोबाईलवर बोलताना सर्वत्र दिसतात. यामुळे सर्वसामान्यांच्या जिवीतासह मालमत्तेलाही धोका संभवतो. पेट्रोल पंप चालकांनीही याबाबत सुरक्षिततेच्या उपायासह सर्व नियमांची कडकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी चर्चा नागरिकात होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा