कोणताही आजार अंगावर काढणे म्हणजे मोठ्या आजाराला निमंत्रण – डॉ.वैशाली किरण

प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्यावतीने महिलांना सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन

अहमदनगर – दैनंदिन जीवनात महिला कुटुंबात एवढ्या व्यस्त असतात की, त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. मासिकपाळी सुरु झाल्यावर व लग्नानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत घडतात. कोणताही आजार अंगावर काढणे म्हणजे मोठ्या आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर असून, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना वंधत्व निवारण व स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली किरण यांनी व्यक्त केली.

प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्यावतीने महिलांचे सदृढ आरोग्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली किरण बोलत होत्या. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, स्वच्छता दूत डॉ. आश्‍लेषा भांडारकर, स्वाती रुपनर, शोभा पोखर्णा, शोभना गट्टाणी, चंद्रकला सुरपुरिया आदिंसह महिला उपस्थित होत्या.

डॉ. वैशाली किरण पुढे म्हणाल्या की, अलिकडील काळात मुलबाळ होत नसल्याने जोडपे निराशावादी बनून योग्य उपचार घेत नाही. वेळीच योग्य मार्गदर्शन व उपचार घेतल्यास मुलबाळ होणे शक्य आहे. विज्ञानाने मोठी क्रांती केली असून, प्रत्येकाच्या जीवनात मुलरुपी अंकुर फुलणार असल्याचे सांगितले. तसेच सदृढ आरोग्यासाठी हिमोग्लोबीन व रक्ताची पातळी, गर्भाशयाचे आजार टाळण्यासाठी घेण्यात येणार्‍या प्रतिबंधात्मक उपायाची माहिती दिली.

प्रास्ताविकात अनिता काळे म्हणाल्या की, महिला कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तीचे आरोग्य उत्तम राहणे गरजेचे असून, यादृष्टीने महिलांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत अलकाताई मुंदडा यांनी केले. या व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वच्छतादूत डॉ. आश्‍लेषा भांडारकर यांनी महिलांच्या मासिकपाळी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मासिकपाळी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा निसर्गत: अविभाज्य घटक आहे. महिला मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त नॅपकीनचा वापर करीत आहे. इतर देशात बंदी असलेले सॅनिटरी नॅपकीनची भारतात सर्रासपणे विक्री चालू आहे. याबद्दल जागृती नसल्याने गर्भाशयाचे धोके महिलांमध्ये वाढले आहेत. यासाठी केमिकल विरहित जैविक पॅडचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर वापरलेल्या पॅडचा मोठा कचरा साचत असून, त्याच्या विल्हेवाटाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जैविक पॅडचा अवलंब केल्यास इतर पॅडच्या तुलनेत त्याचे विघटन देखील लवकर होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मासिकपाळी संदर्भात महिलांमध्ये असलेल्या गैरसमजुतीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

या व्याख्यानावर आधारित महिलांसाठी प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन स्वाती रुपनर यांनी केले. आभार शोभा पोखर्णा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिप्ती मुंदडा, स्वाती नागोरी यांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा