प्रतापगडावरील श्री भवानीदेवी

समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर प्रतापगड वसलेला आहे. अभ्यासकांनी केलेल्या वर्णनात महाबळेश्वरच्या जटात प्रतापगड उभारण्यात आलेला आहे. सन १६५८ च्या सुमारास या किल्ल्याची निर्मिती मोरोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली २ वर्षांत पूर्ण करण्यात आली. कोकण व वाई प्रांत यांना जोडणा-या वाटेवरील या डोंगराच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व शिवछत्रपतींनी हेरले. याच प्रतापगडाच्या भौगोलिक सामर्थ्याचा उपयोग करून शिवछत्रपतींनी अफजलखानाचा व त्याच्या सैन्याचा समूळ पराभव केला. अफजलखान वधाने शिवछत्रपतींची एक शूर, धाडसी व युद्धनिपुण सेनापती अशी प्रतिमा समस्त हिंदुस्थानभर तयार झाली.

सन १६५९ ते १८१८ या प्रदीर्घ कालखंडात सन १६८९ मधील काही महिन्यांचा कालावधी सोडल्यास प्रतापगड शत्रूच्या ताब्यात कधीच नव्हता. शिवप्रतापाचा जिवंत साक्षीदार असणारा प्रतापगड महादरवाजा भक्कम टेहळणी बुरूज, चिलखती बांधणीची बुरूज रचना, भवानी मंदिर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार, जिजाऊंचा वाडा, दिंडी दरवाजा, रेडका बुरूज, केदारेश्वर महादेव मंदिर, सदर यशवंत बुरूज, घोरपड शिल्प, वेताळ मंदिर, कडेलोट स्थान इत्यादी अनेक गौरवशाली ऐतिहासिक अवशेष जपून आहे. गडावरील भवानीमातेची अष्टभूजा महिषासुरमर्दिनीची सिंहारूढ मूर्ती लक्षवेधक आहे. शिवाजीराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून ही मूर्ती घडवून घेतली व जुलै १६६१ मध्ये तिची गडावर स्थापना केली. देवीचा गाभारा लहानसा असून, येथील शिल्पकाम लाकडीच आहे. देवीच्या खर्चासाठी म्हणून पंधरा गावांचे उपन्न लावून दिल्याची नोंद आहे. याच देवीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवारीचा प्रसाद दिला अशी कथा जनमानसात रूढ आहे. परमानंद कवीच्या संस्कृत शिवभारतात ‘भवानी तलवार’ हे नाव का पडले याचा संदर्भ देण्यात आलेला आहे.

प्रतापगड येथील मूर्तीसंबंधी चिटणीस बखरीत पुढील उल्लेख मिळतो ‘पर्वताचा राज लीलासेन याचे राज्यापावेतो जाऊन त्रिशूळगंडकी व श्वेतगंडकी आणि सरस्वती संगमी शिळेचा शोध करून उत्तम शिळा प्राप्त झाली. सिलपी प्रांतीचे हुनरवंद आणून मूर्ती सिद्ध केली आणि मोरोपंत प्रधान यास मागणे पाठवून प्रतिष्ठा केली. सभासद बखरीत भवानीने राजांना मार्गदर्शन केल्याची व अभय दिल्याची अनेक वर्णने आहेत. प्रतापगडाच्या ऐतिहासिक साधनांचे संकलन मांडताना व संशोधित करताना येथील भौगोलिक स्थानाच्या महत्त्वाचे व बदलत्या बदलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवकाळात नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उत्कृष्ट शिळा मिळवून गडावरील सध्या असणारी भवानी घडवली गेली, असाही संदर्भ मिळतो. अभ्यासकांनी प्रतापगडास युद्धशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, ऐतिहासिक संदर्भ अशा विविध अंगांनी न्याय दिला पाहिजे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा