आता केवळ 3 दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट

मुंबई – आता मोबाईल नंबर पोर्ट करणे अधिक सोपे होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ढठख) मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीसाठी नवीन नियमावली सादर केली आहे. यानुसार, आता केवळ 3 दिवसांच्या आत ग्राहक नंबर पोर्ट करु शकणार आहेत. तर एका सर्कलवरुन दुसर्‍या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करायचा असल्यास 5 दिवसांचा अवधी लागणार आहे. मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीचे हे नवीन नियम 16 डिसेंबरपासून लागू होतील. सुधारित नियमानुसार जर ऑपरेटरने चुकून पोर्टिंग अर्ज नाकारला तर त्याला 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. नवीन सुधारित नियमांनुसार सर्वात मोठा बदल यूनिक पोर्टिंग कोड (यूपीसी)शी संबंधित आहे. त्यानुसार आता टेलिकॉम ऑपरेटरला यूपीसीचा अर्ज मिळेल आणि तो त्वरित संबंधित एमएनपीएसपीकडे पाठविला जाईल. एमएनपीएसपी, डोनर ऑपरेटरच्या डेटाबेसद्वारे तपासणी करुन यूपीसी जनरेट करेल आणि नंतर तो ग्राहकांना पाठवेल. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ 3 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे.