नगर तालुका पोलीस ठाणे जनतेसाठी अत्यंत गैरसोयीचे

अहमदनगर- भिंगार येथील कॅन्टोंमेंट हॉस्पिटलसमोर सद्या नगर तालुका पोलिस स्टेशन स्थलांतर केले आहे ते नगर तालुक्यातील जनतेला अत्यंत गैरसोयीचे आहे. हे तालुका पोलिस स्टेशन नगर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरीत केल्यास तालुक्यातील जनतेला हे नवे पोलिस स्टेशन मध्यवर्ती ठिकाण असल्याने सोईचे ठरणार आहे. तालुक्यातील जनता शहरात विविध कामांसाठी येतात त्यामुळे जुन्या न्यायलयाच्या इमारतीत तालुका पोलिस स्टेशन उपयुक्तच ठरेल. शिवाय पार्किंगसह सुविधा जुन्या न्यायालयाच्या आवारात उपलब्ध होऊ शकतात. तरी याबाबत शासनाने, पोलिस प्रशासनाने निर्णय घेऊन त्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात भिंगार शहर काँग्रेस कमिटीने एका निवेदनाद्वारे तालुका पोलिस स्टेशनच्या स्थलांतरासहीत भिंगार शहर पोलिस स्टेशनचे स्थलांतराची मागणी केली आहे. भिंगार शहर पोलिस स्टेशन हे ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीत आहे. ही इमारत भिंगार शहराच्या मध्यवर्ती भागात असून, या इमारतीसमोर वाहतुकीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच पोलिसांची वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

वास्तविक हे पोलिस ठाणे ज्या जागेत आहे तेथे पूर्वी घोडे बांधण्याची जागा होती. जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाणे नव्या इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. भिंगार शहर पोलिस ठाण्याच्या नाशिबी नवी इमारतीचा मुहूर्त अजून नाही, परंतु हे पोलिस ठाणे जर कॅन्टोंमेंट हॉस्पिटलच्या समोर जे तालुका पोलिस स्टेशन आहे, त्या जागेत स्थलांतर केल्यास भिंगारकरांना सोईचे होईल. तरी शासनाने व पोलिस प्रशासनाने या दोन पोलिस स्टेशनच्या स्थलांतराचा प्रश्‍न गांभिर्याने विचारात घेवून त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भिंगार काँग्रेस अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले आणि पदाधिकार्‍यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, नाशिक़ विभागीय पोलिस उपायुक्त राज्याचे गृहसचिव आणि मा.राज्यपाल आदिंना या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. शहराध्यक्ष अॅड. पिल्लेंसह पदाधिकारी सर्वश्री शामराव वाघस्कर, श्रीमती मार्गारेट जाधव, निजाम पठाण, संजय झोडगे, रिजवान शेख, रमेश त्रिमुखे, अॅड.साहेबराव चौधरी पाटील, सुभाष त्रिमुखे, अनिल परदेशी, सोपानकाका साळूंके आदिंच्या या निवेदनावर सह्या आहेत.

नगर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या इमारती या जुने कोर्ट गल्लीत रिकाम्या आहेत. त्याचा वापर होत नसल्याने येथे स्वच्छता, कचर्‍याचे ढिग आदि गैरसोयी निर्माण होतील, त्यामुळे या सर्व इमारतींमध्ये तालुका पोलिस स्टेशनसह विविध कार्यालय स्थलांतरीत झाल्यास शहरातील आणि तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना ते साईचे ठरेल, अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये शहराच्या विविध भागात विखुरलेले आहेत. ती सर्व एकाच ठिकाणी येईल. याबाबतही शासनाने विचार करावा, अशी मागणी भिंगार काँग्रेसने शासनाला दिला आहे.