जिल्हा रूग्णालयात 6 व 7 डिसेंबर रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर

 

नगर – भारतीय जैन संघटना, स्व.चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट व सिव्हील हॉस्पिटल यांच्या विद्यमाने स्व.डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्य डॉ. दीक्षित यांचे सहकारी डॉ. राज लाला यांचे 20 वे ‘मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर 6 व 7 डिसेंबर या कालावधीत नगरमधील जिल्हा रूग्णालयात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरांच्या दोन दशकांच्या वाटचालीत आजपर्यंत अहमदनगरमध्ये 7 हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यंदाही अधिकाधिक लोकांपर्यंत या शिबिराचा लाभ पोहचविण्याचा प्रयत्न आहे. किशोर मुनोत यांनी सांगितले की, गेल्या 19 वर्षापासून प्लास्टिक सर्जरी शिबिराचा उपक्रम अहमदनगरमध्ये यशस्वीरित्या राबविला जात आहे.

या उपक्रमाचा आर्थिक सहभाग चांदमल मुनोत ट्रस्ट यशस्वीपणे पेलत आहे. मानव सेवेचा हा वसा भविष्यातही समाजासाठी अविरत चालू राहणार आहे. 19 वर्षापासून सिव्हील हॉस्पिटलमधील सर्व स्तरावरील कर्मचारी या शिबिराची तांत्रिक बाजू यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या शिबिराची प्रत्येक कर्मचारी चातकाप्रमाणे वाट पहात असल्याचे सिव्हील सर्जन डॉ. पी.ए.मुरंबीकर यांनी सांगितले. यंदाचे शिबीर दोन दिवस चालणार असून 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सिव्हील हॉस्पिटल, पत्रकार चौक, अहमदनगर येथे नाव नोंदणी व त्याचदिवशी दुपारी शस्त्रक्रिया होणार आहेत. शिबिरात रूग्णांनी उपाशीपोटी येणे आवश्यक असल्याचे शिबीर प्रमुख अरूण दुग्गड व आदेश चंगेडीया यांनी सांगितले.

या शिबिरासाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा रुग्णालयास व संघटनेस सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात येत असते. या भारतभर सुरु केलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिराचे हे 20 वे वर्ष असून यापुढेही हे कार्य सतत चालू राहणार आहे.

सदरील शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, पापण्यामधील विकृती, चेहर्‍यावरील व्रण, नाक, कान यामधील बाह्य विकृती यावर मोफत सर्जरी होणार आहे. अशा शस्त्रक्रियांचा खर्च सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे समाजातील गरजू घटक या शिबिराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात.

अध्यक्ष प्रशांत गांधी, संघटनेचे सचिव योगेश चंगेडिया, शिबीर सहप्रमुख डॉ.दिपा भळगट, डॉ.नूतन फिरोदिया, प्रीतम राका, महिला अध्यक्ष प्रियांका चंगेडिया आदी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. शिबिराची अधिक माहिती व सहभागासाठी आदेश चंगेडिया (मो.9822288449) व अरूण दुग्गड (मो.9822027373).

शिबिराच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यातील गावागावात शिबिराची माहिती असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच गावपातळीपर्यंतच्या सर्व शाखांचे कार्यकर्त, जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक तसेच सर्व वृतपत्रे, सामाजिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत शिबिराविषयी अधिकाधिक लोकांना माहिती होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी सुध्दा शिबिरासाठी 500 ते 600 रुग्ण येण्याची अपेक्षा आहे. यातील सुमारे 300 जणांवर प्रत्यक्ष मोफत प्लास्टिक सर्जरी होणे अपेक्षित आहे. ऑपरेशन झालेल्या रुग्णांची फ ेर तपासणी डॉ. सागर पटवा करणार आहेत. गेल्या 17 वर्षापासून ते या कामी योगदान देत आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्व.चांदमल मुनोत नेवासकर ट्रस्टचे किशोर मुनोत, भारतीय जैन संघटना अहमदनगर शाखेचे मार्गदर्शक शरद मुनोत, अरुण दुगड, अशोक मुथा, संजय गुगळे, अभय बोरा, शशिकांत मुनोत, भारतीय जैन संघटनेचे सभासद महेश गुंदेचा, पायल चंगेडीया, सीमा मुनोत, सुवर्णा डागा, गिरीश आग्रवाल, धीरज गांधी, अभय पुंगलिया, अजय बोरा, आनंद चोपडा, देवांग कुर्वा व कार्यकर्त प्रयत्नशील आहेत.