धूम इलेक्ट्रिक सी प्लेनची

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना येऊ घातलेला आहे. त्याची सुरूवात म्हणून अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने निर्माण केली जात आहेत. त्यामध्ये अगदी दुचाकी गाड्यांपासून ते विमानांपर्यंतचाही समावेश आहे. कॅनडात व्हँक्युवर येथे पूर्णपणे विजेवर चालणार्‍या व्यावसायिक विमानाची चाचणी घेण्यात आली. हे एक सीप्लेन म्हणजेच समुद्राच्या पाण्यावरून उड्डाण करणारे तसेच लँडिंग करणारे विमान आहे.

या विमानाने चाचणीवेळी पंधरा मिनिटे उड्डाण केले. सिएटलच्या मॅग्निक्स कंपनीने याबाबतची माहिती दिली. खरे तर हे 62 वर्षांपूर्वीचे सी -प्लेन असून त्यामध्ये 750 एचपीची इलेक्ट्रिक मोटार बसवण्यात आली आहे. या विमानात सहा प्रवासी बसू शकतात. ऑस्ट्रेलियातील इंजिनिररिंग फर्म ‘मॅग्निएक्स’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोई गॅजार्स्की यांनी सांगितले की हे तंत्रज्ञान स्वस्त हवाई प्रवास उपलब्ध करुन देईन. त्यामधून कार्बन उत्सर्जनही होणार नाही हे महत्त्वाचे. ई-विमानांची ही नांदीच असल्याचे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारची ईको-फ्रेडली विमाने आता काळाची गरज असून त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल.