फार्मासिस्ट एक दुर्लक्षित ‘कोरोना योद्धा’

सध्या ‘कोरोना’ या नवीन संसर्गजन्य रोगाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ‘कोरोना’ बाधितांची संख्या आणि मृतांचा वाढता आकडा आपल्याला जाणीव करून देतो की अतिसूक्ष्म विषाणू सुद्धा मानवाला हतबल करू शकतो. अशा या संसर्गजन्य रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी जे लोक अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्यांना आपण ‘कोरोना योद्धा’ असे म्हणतो.  हे ‘कोरोना योद्धे’ आपल्या जिवा पेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत आहेत, त्यासर्वांना मानाचा मुजरा.

ज्या पद्धतीने या आपत्ती काळामध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, पोलीस, प्रसार माध्यमे, समाजसेवक अशा अनेक ‘कोरोना योद्ध्यां’चे कौतुक केले जाते, येथे कुठे तरी आपणा सर्वांना फार्मासिस्ट या महत्त्वपूर्ण घटकाचा विसर पडलाकी काय? असा प्रश्न निर्माण होतो. ‘कोरोना’ युद्धात फार्मासिस्ट आणि त्याचे सहाय्यक पुष्कळ अडचणींना तोंड देऊन रुग्णसेवा तर करतच आहेत पण काही फार्मासिस्ट हे गरजू रुग्णांना मोफत औषध वितरित करत आहेत याची आपण नोंद नक्कीच घेतली पाहिजे.

वैश्‍विक आरोग्याचा गाडा वैद्यकीय शास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र हे दोन चाके ओढत असतात. ‘कोरोना’च्या या संकट काळामध्ये जसे डॉक्टर्स रुग्ण सेवा करत आहेत तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट सुद्धा रुग्णांना औषधे पुरवताना आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत. फार्मासिस्ट हा लोकांसाठी फर्स्टपॉईंट ऑफ कॉन्टॅक असतो. किरकोळ शारीरिक तक्रारींसाठी सर्वजण सहसा मेडिकलवरती धाव घेताना दिसतात कठीण समय येता फार्मसिस्ट कामास येतो असे कोणी म्हटले तर वावगे वाटायला नको.

नैसर्गिक अथवा रासायनिक घटकांपासून औषध निर्माण करण्याचे शास्त्र म्हणजेच औषध निर्माणशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र ही पदविका, पदवी किंवा पदवीत्तर पदवी घेतलेला व्यक्ती म्हणजे फार्मासिस्ट. मेडिकल स्टोअर्समधून औषधे विकणारा म्हणजे फार्मासिस्ट हा आपल्या समाजाचा मोठा गैरसमज आहे. फार्मासिस्ट म्हणजे फक्त मेडिकल स्टोअर्समधून औषध देणारा नसून तो औषधे तयार करणारा, त्याची गुणवत्ता तपासणारा, त्याचे दुष्परिणाम शोधणारा, त्याचा योग्य डोस ठरवणारा, त्याची माहिती डॉक्टरांना सांगणारा, अशा अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या भूमिका निभावणारा असतो. सद्य परिस्थितीमध्ये ‘कोरोना’ व्हायरस विरुद्ध संजीवनी शोधण्यासाठी सर्व जग जो आटापिटा करत आहे त्यामध्ये फार्मासिस्टची एक अग्रगण्य महत्त्वाची भूमिका आहे. अशा या आरोग्य रक्षकाला आपण विसरता कामा नये ही विनंती. वैश्‍विक आरोग्यासाठी फार्मासिस्टचे अनमोल योगदान आहे म्हणूनच केशवसुतांच्या कवितेतील काही ओळी आठवतात,

आम्हाला वगळा गत प्रभ झणी होतील तारांगणे,

आम्हाला वगळा विकेल कवडीमोलावरी हे जिणे.

आज आपण पाहतो ‘कोरोना’ सारख्या भयंकर महामारीने संपूर्ण जगावर मृत्यूचे थैमान घातले आहे परंतु या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगामध्ये औषध निर्मिती व संशोधन हा उद्योग अविरतपणे सुरू आहे, त्यामुळे भविष्य काळात औषध निर्माण क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. मी सुद्धा एक फार्मासिस्ट आहे आणि परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे. हे कॉलेज गेली अकरा वर्षे अविरत व अखंडपणे औषध निर्माणशास्त्राचे विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहे. या महाविद्यालयात पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण उपलब्ध आहे.

प्रा. जयदीप बाबासाहेब पवार

परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी, काष्टी,

ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर. मो. ९४ २२ ०१ ८२ ३६