केस दाखल केल्यावरून एकास मारहाण; नगरसेवकासह अनेकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर- आमच्या विरोधात केस का केली? असे म्हणून पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के (वय 30, रा. संचारनगर, माऊली मंदिरासमोर, पाईपलाईन रोड, नगर) यास बळजबरीने मोटारसायकलवर बसवुन नगरसेवकाच्या कार्यालयात नेवून लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडके व लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.11) रात्री 10 वा. संचारनगर, पाईपलाईन रोड, श्रीराम चौक येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पांडुरंग म्हस्के यास अमित गाडे, प्रताप गायकवाड व अन्य 4 ते 5 जणांनी तु आमच्या विरोधात केस का केली? असे म्हणुन त्यास बळजबरीने मोटारसायकलवर बसवुन पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौक येथे नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या संपर्क कार्यालयात नेऊन त्यास शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आमच्या विरोधात तक्रार का केली? असे म्हणत नगरसेवक त्रिंबके यांच्यासह सर्वांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने परत मारहाण केली व केस मागे घे, असे सांगितले.

या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी पांडुरंग म्हस्के यांच्या फिर्यादीवरून भादंविक 326, 367, 143, 147, 149, 323, 504, 506, मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3), 135 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.