पुढचा मुख्यमंत्री आपल्याच परशुराम सेवा संघचा असेल – राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे 

अहमदनगर – परशुराम सेवा संघ हा कोणाच्या विरोधात काम करत नसून ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी काम करते. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक मध्ये प्रत्येक सदस्याने जबाबदारी कशाप्रकारे घ्यायची आणि आपण काय केले हे जिल्हाअध्यक्ष यांनी सांगितले आणि पुढे काय करायचे हे प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितले आहे.

एक व्यापक रूप लवकरच परशुराम सेवा संघ घेणार आहे. येणारा भविष्य काळ परशुराम सेवा संघासाठी खूप चांगला राहणार आहे. हे सर्व काम बघून अत्ताच मला असे वाटतय कि प्रत्येक ठिकाणी यापुढे विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच परशुराम सेवा संघचा असेल, असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी केले.

परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक नगर एम.आय.डी.सी येथे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे देवा यांनी आयोजित केली. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे, उपाध्यक्ष मोरेश्वर सदावते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हास अकोलकर, प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे, उपाध्यक्ष उपेंद्र जपे, महेश सारणीकर, विनायक रत्नपारखी, प्रदेश संघटक आबासाहेब एडके, प्रदेश सरचिटणीस संजय रुईखेडकर, सौ. उत्तरा अकोलकर, महाराष्ट्र संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सराफ, शहरअध्यक्ष स्वाती धनेश्वर, पुणे जिल्हाअध्यक्ष ऋषिकेश सुमंत व स्वप्नील कुलकर्णी, जिल्हा संघटक धनंजय गटणे, शहर संपर्कप्रमुख अजय कुलकर्णी, शहर सचिव गौरव देशपांडे, साक्षी वाळवेकर, स्मिता भोंगे, सुषमा कुलकर्णी, मंगल गंधे, निकिता रसाळ सह जिल्हातील आणि महाराष्ट्रातील सदस्य उपस्थित होते.

या बैठक प्रसंगी ‘ब्रह्मप्रस्थान छळाकडून बळाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सराफ यांनी जिल्ह्यात केलेली उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची परशुराम सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. संजय रुईखेडकर, नगर शहर सचिवपदी गौरव देशपांडे, कार्याध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी, जिल्हा मार्गदर्शकपदी संगीता कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ. हर्षदा एडके, शहर संघटकपदी दत्तात्रय खिस्ती, परभणी जिल्हासंघटकपदी वैभव देशपांडे, परभणी जिल्हाध्यक्षपदी भगवान पाटील, लातूर युवा शहरसंघटकपदी श्रीराम जोशी, जळगाव जिल्हाध्यक्षपदी अनिरुध्द कुलकर्णी या नियुक्त्या करण्यात आल्या.

याप्रसंगी प्रदेशअध्यक्ष विश्वजित देशपांडे म्हणाले, आपण जोपर्यंत परशुराम सेवा संघाची सभासद नोंदणी अभियान संपूर्ण देशात, महाराष्ट्रात राभवत नाही तोपर्यंत आपली ताकद वाढणार नाही. ही मोहीम आपण लवकरच सुरु करणार आहोत. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत पोचता येईल आणि सर्वांना या परशुराम सेवा संघाचा सदस्य होता येईल. या माध्यमातून सर्व अडचणी, समस्यांना वाचा फोडण्याचे काम करण्यात येईल. या संदर्भातला सर्व आराखडा प्रत्येक सदस्यांपर्यंत पोचवला जाईल आणि सर्वांना त्याच पद्धतीने काम करायचे आहे, असे सांगितले. सुत्रसंचलन जिल्हामार्गदर्शक संगीता कुलकर्णी यांनी केले तर आभार महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे देवा यांनी मानले.

या बैठकीप्रसंगी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व जिल्हाअध्यक्षाच्या समस्यांचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी निवारण करून त्यांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यास सांगितले. तसेच या अभियानासाठी नोंदणी संपर्कप्रमुक म्हणून कमलेश शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.