शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्यातील दबंग आमदार, ते विजयाचा षटकार ठोकणार – ना.पंकजा मुंडे  

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पांढरीपूल येथील जाहिर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर साधला निशाणा

अहमदनगर – नगर जिल्ह्यातील राजकारण मी जवळून अनुभवले आहे. येथील सर्व राजकीय घडामोडींवर आपण बारकाईने लक्ष ठेवत असतो. मतदार संघातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्यातील दबंग आमदार आहेत. ते विजयाचा षटकार ठोकणार यात तिळमात्र शंका नाही, ही त्यांच्या प्रचाराची नव्हे तर विजयाचीच सभा असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

राहुरी – नगर मतदार संघातील भाजपचे उमेदवार आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुंडे यांची पांढरी पुल येथे सभा झाली. यावेळी खा.डॉ सुजय विखे, आ.कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिकाताई राजळे, नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, मृत्युंजय गर्जे, पुरुषोत्तम आठरे, माणिकराव खेडकर, अभय आव्हाड, अशोक गायकवाड, सत्यजित कदम, उदयसिंह पाटील, चाचा तनपुरे, दत्तुभाऊ काळे, भाऊसाहेब पठारे, दिलीप भालसिंग, अनिल गिते, विक्रम तांबे, सुधाकर पालवे, बाळासाहेब अकोलकर, गुजरातचे आ.चेतन इनामदार आदी उपस्थीत होते. यावेळी विठ्ठलराव लंघे, भीमराव फुंदे यांनी भाजपात प्रवेश केला.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, नगरच्या मुळाचे पाणी बीड मध्ये जाणार अशी अफवा सध्या जोरात सुरू असुन आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत, यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. त्यापुढे म्हणाल्या की आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत यामुळे राष्ट्रवादी वाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असून राज्यात पुन्हा महायुतीची एकहाती सत्ता येणार आहे. आम्ही एक एक आमदार विजयी व्हावा यासाठी स्वतचे मतदार संघ सोडुन राज्यभर फिरत आहोत .

विरोधकांच्या राजकारणाचे आता बारा वाजले असुन येत्या २४ तारखेला रात्री १२ वाजुन १२ मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. युती सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाला न्याय देण्याचा  निर्णय घेतला. जाती पातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे. कलम ३७० हा प्रचाराचा मुद्दा होत असल्याचा आमच्यावर आरोप होत आहे. पण कलम ३७० हा प्रचाराचा नव्हे तर आमच्यासाठी संस्काराचा व स्वाभिमानाचा मुद्दा आहे. यावेळी विखे कर्डिले मुरकुटे यांची भाषणे झाले .

मुळाचे घोटभर पाणी ही बीड ला जाणार नाही – आ.कर्डिले

मुळाचे पाणी बीड ला जाणार असल्याच्या अफवा सुरू असल्याचे सांगुन आ.कर्डिले म्हणाले की मुळाचे एक घोटभर पाणी ही बीड ला जाऊ देणार नाही. ते म्हणाले की माझ्यावर प्रत्येक वेळी गुन्हेगारीचा आरोप होत आहे. आरोप करण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने विरोधक असे आरोप करत आहेत. लोकांमध्ये राहतो त्यामुळे जनता आपल्याला स्वीकारते, आता विजयाचा षटकार आपण मारणार असून त्यासाठी मला कोणाही भविष्यकाराची गरज नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तुमच्यासाठी सोनईत सभा घेतो – खा. विखे

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी खा. सुजय विखे यांना माझ्यासाठी नेवासात सभा घेण्याची विनंती केली. विखे माझी सभा टाळत असुन त्यांनी नात्यापेक्षा मैत्रीला जपावे असी टिप्पनी मुरकुटे यांनी करताच खा.विखे यांनी आपल्या भाषणात तुमच्यासाठी सोनईला सभा घेतो असे ठणकाऊन सांगुन विठठलराव लंघे कुणामुळे भाजपात आले हे त्यांना विचारा असे स्पष्टीकरण देऊन चर्चेला पुर्णविराम दिला.