ऑनलाईन बाजारपेठेतील परकीय कंपन्यामुळे स्थानिक बाजारपेठा उध्वस्त होण्याच्या मार्गावर

ऑनलाईन मोबाईल विक्रीवर बंदी घालावी; नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शने करत मोबाईल विक्रेत्यांची मागणी

अहमदनगर- पायातील चप्पल, बुट पासून ते डोक्याला लावायच्या तेलापर्यंत आणि कपड्यांपासून ते घर वापराच्या अनेक वस्तूंसह मोबाईलपर्यंत सर्वच वस्तूंची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी होत असल्याने आज स्थानिक बाजारपेठा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ऑनलाईन बाजारात उतरणार्‍या परकीय कंपन्या केंद्र सरकारच्या एफडीआय धोरणाच्या नियमावलीचे उल्लंघन करत भारतीय बाजारपेठांवर अधिराज्य गाजविण्याच्या तयारीत असून या कंपन्यांना आवर घालण्याची मागणी करत अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तोट्यात धंदा करणार्‍या कंपन्यावर सरकारने तातडीने बंदीची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ऑनलाईन बाजारातील कंपन्यांविरुध्द अहमदनगर मोबाईल रिटेलर असो.ने आवाज उठविला असून देशव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात असो. चे अध्यक्ष अजित जगताप यांच्या नेत्वृत्वाखाली नगरमधील मोबाईल विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी भूपेंद्र रासने, संतोष बलदोटा, गोरख पडोळे, अतूल रच्चा, मनिष चोपडा, उमेश धोंडे, अविनाश निक्रड, पंकज मेंघानी, सागर नहार, पंकज सदरे, नागपाल, साजिद जहागीरदार, आवेज भाई, जावेद भाई, श्री. खान, प्रितम तोडकर, रितेश सोनीमंडलेचा आदी उपस्थित होते.

असो. अध्यक्ष अजित जगताप म्हणाले की, भारत सरकारने एफडीआयला मंजूरी दिल्यानंतरा देशभरात ऑनलाईन खरेदीला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. आज अनेक परकीय कंपन्या या ऑनलाईन बाजारात उतरल्या आहेत. ऑनलाईन खरेदीत वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी या कंपन्या सरकारी धोरणांची पायमल्ली करत आहेत. तोट्यात धंदा करायचा नाही असे एफडीआयच्या धोरणातील महत्वाचा नियम आहे. परंतु या परकीय कंपन्या दरवर्षी तीन, चार, पाच हजार कोटीचा तोटा सहन करुन धंदा करत आहेत ब्रिटीश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीने जशी भारतीय बाजारपेठ गिळंकृत करण्याचे काम केले त्याचप्रमाणे सध्या परकीय कंपन्या तोटा सहन करुन भारतीय बाजारपेठ उध्दस्त करण्याचे काम करत आहेत.

ऑनलाईन खरेदीचा स्थानिक बाजारपेठेवर विपरित परिणाम होत आहे. मोबाईल क्षेत्रात या ऑनलाईन बाजारामुळे सुमारे 3 लाख नोकर्‍या गेल्या आहेत. सरकारने या गंभीर बाबीचा विचार करुन तोट्यात धंदा करण्यार्‍या ऑनलाईन कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणी अजित जगताप यांनी केली आहे.

दिल्लीत धरणे आंदोलन करणार

ऑनलाईन कंपन्यांविरोधात आवाज उठविताना आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात स्थानिक पातळीवर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात दिल्ली येथे 10 हजार व्यापार्‍यांचे अधिवेशन घेऊन तेथेच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जगताप यांनी सांगितले.