ओंकारनगर शाळेत बहरली हिरवाई

अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेने शालेय परिसरात विविध प्रकारच्या 155 झाडांची लागवड करून शालेय परिसरात नंदनवन निर्माण केले आहे. सर्वत्र दुष्काळाची दाहकता पाहून मन हेलावून जाते, पण या रखरखत्या उन्हाळ्यातही ओंकारनगर शाळेतील हिरवीगार बाग पाहून सर्वांना प्रसन्नतेचा सुखद गारवा मिळतो.

ओंकारनगर शाळेत फळांची, फुलांची, सावली देणारी, औषधी गुणधर्म असलेली, शोभेची, दुर्मिळ असलेली सुमारे 155 झाडे लावून उत्कृष्टपणे जतन करण्यात आली आहेत. सन 2014 पासून दिवंगत मल्हारी देसाई व त्यांचा परिवार, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे आणि शाळेतील विद्यार्थी यांनी या झाडांची लागवड केली आहे.

या झाडांची नियमितपणे काळजी घेण्यात येते. विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक स्वतः झाडांची लागवड करतात. त्यांना पाणी घालतात. पर्यावरणातून शिक्षण हा अभिनव उपक्रम ओंकारनगर शाळेत राबविण्यात येत आहे.

शाळेने फक्त जिवंत झाडे जगवली नाही तर वठलेली (वाळलेली) झाडेही रंग देऊन जिवंत केली आहेत. वाळलेल्या झाडांना रंग देऊन विद्यार्थ्यांना रंगांची ओळख करून देण्यात आली आहे. मत झाडांनाही जिवंतपणा आणून विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंददायी शिक्षणाचा नवा धडा गिरवण्यात येत आहे. उद्योजक परेश पित्रोडा यांच्या सहकार्यातून प्रत्येक झाडाला मराठी व इंग्रजी नामफलक लावण्यात आला आहे. त्यामुळे मुलांना सहजपणे झाडांबद्दल माहिती मिळते. शालेय पोषण आहार योजनेत बनवण्यात येणार्‍या पदार्थांसाठी लागणारे शेवगा, कढीपत्ता, लिंबू इत्यादी झाडेही शाळेत लावण्यात आले आहेत व त्यांचा नियमितपणे शालेय पोषण आहारात उपयोग केला जातो.

शाळेतच तयार करण्यात येणारे कंपोस्ट खत या झाडांना दिले जाते. शाळेतील शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीतही झाडांना पाणी देण्यासाठी शाळेत उपस्थित राहतात. शाळेतील झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. मुले नियमितपणे झाडांची काळजी घेतात. मुलांना पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून हा एक अभिनव प्रयोग शाळेमध्ये राबविण्यात येत आहे.

शाळेत असलेली झाडे – आवळा, बदाम, फणस, अंजीर, पेरु, चिंच, चिकू, गुलमोहर, लिंबू, आंबा, हादगा, चाफा, जांभूळ, वड, शेवगा, कढीपत्ता, अशोका, गुलाब, जाई – जुई, करंज, सीताफळ, डाळिंब, कौठ, गवतीचहा, तुळस, पुदिना, पिंपळ, उंबर, जास्वंद, चंदन, कोरफड, कडुलिंब, बोगनवेल.

या झाडांचे संवर्धन करण्यामध्ये ओंकारनगर शाळेच्या परिसरातील नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. तसेच स्थानिक नगरसेवक सर्व अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा