नॉमीनीला हवी विम्याची माहिती

जीवन विमा पॉलिसी हे अडचणीच्या काळात उपयुक्त आर्थिक साधन आहे. खाते कोणतेही असो त्याचा नॉमिनी असणे बंधनकारक आहे. त्याला विमा पॉलिसीही अपवाद नाही. पॉलिसीधारक नॉमिनीचा उल्लेख करतात, मात्र त्याची माहिती वारशाला देण्याची आवश्यकता वाटत नाही. अशा कृतीमुळे संकटकाळात नॉमिनीला दावा मिळताना अडचणी येऊ शकतात. म्हणून नॉमिनीला पॉलिसीची माहिती असेल तर दावा मिळणे अधिक सुलभ जाते. विमाधारकाने पॉलिसी काढल्यानंतर पुढील खबरदारी घेतल्यास भविष्यातील संभाव्य अडचणी टळतील.

माहिती देणे फायदेशीर

विमा पॉलिसीत नॉमिनी म्हणून साधारणपणे पती, पत्नी, आई-वडिल, मुलगा-मुलगी यांचे नाव दिले जाते. विमा तज्ञांच्या मते, विमाधारकाने जर नॉमिनीला पॉलिसी आणि त्याच्या नोंदीची माहिती दिली नसेल आणि दुर्देवाने विमाधारकसमवेत काही घटना घडली तर दावा करताना अडचणी येऊ शकतात. कारण जोपर्यंत विमा कंपनीला वारसदारांचे नाव कळत नाही, तोपर्यंत त्याच्याशी संपर्क साधला जात नाही. विम्याचा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार हा वारशाला, नॉमिनीलाच असतो.

विमा कंपनीला तात्काळ माहिती द्या

विमाधारकाचा पॉलिसीदरम्यान मृत्यू झाला असेल तर मृत्यू दावा (डेथ क्लेम) करण्यासाठी विमा कंपनीला त्याची तात्काळ माहिती द्यावी लागते. त्यामुळे अर्जाची आणि दाव्याची प्रक्रिया वेगाने होते. दावा मिळण्यास कमी वेळ लागतो.

एजंटला सांगण्यास विसरू नये

विमाधारकाचा मृत्यू झाल्यास डेथ क्लेमसाठी विमा कंपनीच्या एजंटला लवकरात लवकर माहिती देणे गरजेचे आहे. पॉलिसीच्या कागदपत्रावर एजंटच्या नावाचा उल्लेख असतो किंवा एजंट क्रमांक असतो. त्यानुसार एलआयसी कार्यालयातून माहिती घेऊन एजंटशी संपर्क करावा. एजंटला दाव्याची संपूर्ण प्रक्रिया ठाऊक असते. त्यामुळे तो योग्य तर्‍हेने अर्ज भरण्यासाठी नॉमिनीला मदत करू शकेल.

कागदपत्र आवश्यक

दाव्यासाठी विमाधारकाचे मृत्यूपत्र, पॉलिसीचे कागदपत्रे, शेवटच्या हप्त्याची पावती आणि नॉमिनीचे ओळखपत्र, वयाचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉमिनीचे बँक खाते असणे गरजेचे आहे. पॉलिसीत उल्लेख केलेल्यानुसारच वारसदाराचे कागदपत्रे असावेत.

विलंब कधी

नॉमिनीची माहिती नसल्यास, कागदपत्रे अर्धवट असल्यास आणि विमा कंपनीला तातडीने माहिती न दिल्यास दावा मिळण्यास विलंब होतो. तसेच पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षाच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत दावा मिळण्यास विलंब होतो. कारण यात कंपनीला माहिती घेण्यास वेळ लागतो. अर्थात दावा तातडीने निकालात काढणे हे विमा कंपनीच्या अजेंड्यावर असते. विमाधारकाला किंवा वारशाला कमीत कमी त्रासात दावा मिळावा यासाठी कंपनी प्रयत्नशील असते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा