निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम आदर्शवत

दिव्यांग व विशेष मुलांसाठी आयोजित रासदांडियास उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर- दिव्यांग व विशेष मुलांसाठी हुरडा पार्टी, पतंग उत्सव, आंबे खाण्याची स्पर्धा व रास दांडिया सारखे अभिनव व कल्पक उपक्रम राबविणारी निरंजन सेवाभावी संस्थाची आज समाजाला नितांत गरज आहे. पालकत्वाच्या भूमिकेतून या मुलांना आनंद मिळावा, जगण्याची उमेद वाढावी यासाठी त्यांचे कार्य दखल घेण्याजोगे आहेच म्हणूनच संस्कृती व परंपरापासून दुरावत चाललेल्या समाजाला जागृत करणारा, वंचित व दिव्यांगासाठीचा निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम आदर्शवत असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पराग नवलकर यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे दिव्यांग व विशेष मुलांसाठी अक्षता गार्डन येथे आयोजित रासदांडिया उपक्रमाचा शुभारंभ देवी पूजन व दीप प्रज्वलनाने पराग नवलकर (राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे कार्यकारणी सदस्य मोहनलाल मानधना, माहेश्वरी महासभा अध्यक्ष विनीद मालपाणी, जीतोचे अध्यक्ष गौतम मुनोत, जीतोचे सचिव अमित मुथा, टी.व्ही.कलाकार क्षितिज झावरे, आनंद बोरा, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ.प्राजक्ता डागा, अतुल डागा, कार्याध्यक्ष मुकुंद धूत, कार्यसचिव सुमित चांडक, निरंजनचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहनलाल मानधना म्हणाले की, संस्थेने अतिशय अभिनव उपक्रम राबविले असून हे कार्य लोकांपर्यंत जावे यासाठी प्रसिद्धी आवश्यक आहे. यामुळे इतरांना प्रेरणा तर मिळेलच व लोकांचा अशा उपक्रमात सहभागही वाढेल. येत्या काळात या मुलांसाठी बालभवन येथे मिनी मरेथॉन आयोजित करावी, त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल.

झी वाहिनीवरील भागो मोहन प्यारे मालिकेतील नावाजलेले नगरचे कलाकार क्षितिज झावरे, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा कार्यकारणी सदस्य व अखिल भारतीय जाजू ट्रस्टवर निवड झाल्याबद्दल मोहनलाल मानधना, जितो अध्यक्ष गौतम मुनोत, सचिव अमित मुथा, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ. प्राजक्ता डागा, लायन्स क्लब अध्यक्ष आनंद बोरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

किरण मनियार यांनी मुलांना नैतिकमुल्य जोपासणार्‍या आर.आर.केबल संचलित हेमा फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.

प्रास्ताविक व स्वागत अतुल डागा यांनी केले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया व जितेंद्र बिहाणी यांचे निरंजनच्या उपक्रमांना सतत मोलाची साथ लाभते तसेच उपस्थित मान्यवर नेहमीच सहकार्य करतात, अशा सर्वांच्या सहकार्याने आम्ही नेहमीच अभिनव विविध उपक्रम घेत राहू.

नगरमधील सावली, उत्कर्ष बालघर, स्नेहालय, अनापप्रेम, सोनवणे वसतिगृह, बाबावाडी अशा विविध संस्थामधील 295 दिव्यांगानी रासदांडीयात सहभाग घेतला होता. उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. दांडिया नंतर मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.