शिक्षक नेते संजय धामणे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई नाशिक विभागीय सहनिबंधकांकडून रद्द

 

नगर- शिक्षक नेते संजय आप्पासाहेब धामणे व अनिता दिगंबर धामणे यांना नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या संचालकपदावरून अपात्रत घोषित करण्याचा नगर तालुका उपनिबंधकांनी काढलेला आदेश नाशिक विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाठकर यांनी रद्द केला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा संचालक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली आहे.

सारोळा सोसायटीचे संचालक असलेले शिक्षक नेते संजय धामणे तसेच सोसायटीच्या माजी व्हाईस चेअरमन अनिता दिगंबर धामणे यांनी यांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज वेळेत भरले नसल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क अ (1)(एक)(ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 58 नुसार पदावर राहण्यास अपात्र ठरत असल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार विरोधी गटाकडून तालुका उपनिबंधकांकडे करण्यात आली होती.

या तक्रारीवरून या 2 संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई नगर तालुका उपनिबंधक आर.बी.कुलकर्णी यांनी दि.6 ऑगस्ट 2018 रोजी केली होती. या कारवाईला या दोन्ही संचालकांनी ऍड. विजय शिंदे यांच्या मार्फत सहकारखात्याच्या नाशिक विभागीय सह निबंधकांकडे अपिल दाखल केले होते.

अपिलात युक्तिवाद करताना तालुका उपनिबंधक यांनी आदेश पारित करताना नैसर्गिक न्यायाचा अवलंब केला नाही. थकीत कर्ज न भरल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यापूर्वी कर्जाची थकबाकी भरलेली असताना देखील चुकीच्या पद्धतीने आदेश पारित केला. त्यामुळे या दोघांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद संयुक्तिक वाटल्याने आणि त्याबाबतसादर केलेले पुरावे पाहून नाशिक विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाठकर यांनी नगर तालुका उपनिबंधकांनी काढलेला आदेश रद्द करत संजय धामणे व अनिता धामणे यांना पुन्हा सन्मानाने संचालक पदावर काम करण्यास रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक नेते संजय धामणे व अनिता धामणे यांच्यावरील कारवाई रद्द झाल्याने गावात फटाके फोडून या आदेशाचे स्वागत करण्यात आले.

याबद्दल नगर तालुका दुध संघाचे संचालक गोराभाऊ काळे, राजाराम धामणे, गावचे उपसरपंच जयप्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, सोसायटीचे संचालक संजय काळे, गोरख काळे, अमित धामणे, मनसुख संचेती यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा