नेहरु मार्केटचे रखडलेले काम लवकरच सुरू करणार – महापौर बाबासाहेब वाकळे 

अहमदनगर- 9 वर्षापासून प्रलंबीत असलेल्या नेहरू मार्केट उभारणीच्या कामात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी लक्ष घालून मंगळवारी (दि.13) या परिसराची पहाणी केली. तर एका महिन्यात काम सुरू करण्याचे आश्वासन देत, संबंधित अधिकार्‍यांना लेआऊट, प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले.

यासंदर्भात या भागातील नगरसेविका सोनाली चितळे यांनी महापौर वाकळे यांना पत्र देवून सदरचे नेहरु मार्केट महापालिकेने स्वत:च उभारावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.

चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्यावतीने गोरगरीब ओटेधारक व गाळेधारकांना हक्काची जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संघटनेच्यावतीने महापौर वाकळे, आयुक्त भालसिंग व खा.विखे यांना यापुर्वी निवेदन देऊन नेहरु मार्केटचा प्रश्न मांडण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापौरांनी या परिसराची पहाणी केली. यावेळी उपायुक्त प्रदिप पठारे, उपामहापौर मालनताई ढोणे, अभियंता कल्याण बल्लाळ, श्रीकांत निंबाळकर, चितळेरोड भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, नगरसेवक दत्ता कावरे, अजय चितळे, संतोष गुगळे, वसंत गुगळे, राजेंद्र चौधरी, सुनंदा ताठे, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, मार्केट विभाग प्रमुख रवी वाखारे, पुष्कर कुलकर्णी, संजय देवकर, बाळासाहेब देशमुख, दत्तोबा कोंडके, बाळासाहेब तरोटे, संजय धारक, बालाजी गौरी आदींसह भाजीविक्रते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संजय झिंजे यांनी चितळेरोडवर भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. नेहरु मार्केटच्या जागेत महापालिकेने स्वच्छता करून तात्पुरत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास भाजी विक्रेते या मैदानात बसण्यास तयार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाचे काम रखडल्याने सदर मैदानाची जागा अनेक वर्षापासून पड आहे. बाजारात येणारे नागरिक लघवीसाठी सदर जागेचा वापर करत असल्याने या भागात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मोठ्या प्रमाणात जागेमध्ये वाहनांची पार्किंग, मांडव, टपर्‍यांचे अतिक्रमण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी महापौर वाकळे यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांना सदर जागेची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. सदर काम कधी सुरू करणार याची विचारणा केली असता महापौर वाकळे यांनी फक्त घोषणा करणार नसून प्रत्यक्ष काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. 9 वर्षापूर्वी नेहरु मार्केट पाडल्यानंतर 72 ओटेधारक भाजी विक्रेते व 15 गाळेधारक रस्त्यावर आले असून, एका महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे महापौरांनी आश्वासन दिल्याने येथील भाजी विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा