लालटाकी येथील पंडित नेहरुंच्या पुतळ्याच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता

अहमदनगर – भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा असलेल्या लालटाकी परिसरात सध्या प्रचंड अस्वच्छता असून या संपूर्ण परिसराची महापालिकेने तातडीने साफसफाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपायुक्त सुनिल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब गाडळकर, नगरसेवक प्रभागा भागानगरे, सुरेश बनसोडे, प्रा.अरविंद शिंदे, सारंग पंधाडे, सुमित कुलकर्णी, साहेबान जहागिरदार, परेश पुरोहित, भारत गारुडकर, सागर सोबले, सुनिल भालेराव, संजय दिवटे, अमोल कांडेकर यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी (दि.14) भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी होत आहे. त्यांचा लालटाकी येथे पूर्णाकृती पुतळा आहे. या परिसरात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असल्याने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने सदर परिसरात स्वच्छता मोहीम राबविणेबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.