चारही बाजूने पाणीच पाणी आणि मध्ये जमिनीचा तुकडा या भौगोलिक स्थितीला आपण बेट म्हणतो. आजूबाजूला सर्वत्र खारं पाणी असूनही या बेटांवर मात्र गोड पाण्याचे झरे सापडतात. तिथे बर्याच प्राणी-पक्ष्यांचा वावर असतो. विपूल वनसंपदा असते. पण ‘द थाऊजंड आयलंड्स’ नावानं ओळखला जाणारा परिसर काहीसा भिन्न आहे. कारण या संपूर्ण परिसरात तब्बल 1864 बेटं पहायला मिळतात. सेंट लॉरेन्स नदीच्या प्रवाहात ही बेटं आहेत. केप व्हिनसेंट आणि ऍलेक्झॅड्रिया बेच्या दरम्यान वाहणार्या प्रवाहात ही बेटं तयार झाली आहेत. या बेटांचा आकार विभिन्न आहे. म्हणजे एखादं बेट चाळीस स्क्वेअर मैलाचं आहे तर एखादं बेटं इतकं छोटं की त्यावर केवळ एकच घर बांधता येईल. खडकाचा एखादा भाग बाहेर आल्यामुळे तयार झालेलं हे बेट आहे. आश्चर्य म्हणजे यातील बहुतांश बेटांवर माणसं राहतात. आपण शेजारी शेजारी घरं बाधून राहतो त्याप्रमाणे तसे लोक या जवळजवळच्या बेटांवर घरं बांधतात. साहजिकच प्रवासासाठी त्यांना बोटीचाच आधार घ्यावा लागतो कारण चोहीकडे पाणी असताना दुसरा पर्यायच नाही. अशावेळी ते बोटीतच रस्त्यावर चालणारी वाहनं ठेवतात आणि किनार्यापर्यंत बोटीतनं प्रवास करून नंतरचा रस्त्यावरचा प्रवास या वाहनांनी करतात. विशेष म्हणजे एवढ्याशा बेटावरील त्यांची घरंसुद्धा सर्व आधुनिक सोयीसुविधांनी समृद्ध आहे.