साहित्य सहवास – ‘बदल’

 

 

त्यांच्या रिटायर्मेंटला चार वर्षे राहिली त्याचवेळी ऑफिसमधील सर्व कामं संगणकीकृत झाली. त्यांनी तर संगणकाची धास्तीच घेतली. संगणकावर काम करायला मला जमणारंच नाही, मी सेवानिवृत्तीच घेतो असं ते म्हणू लागले. चार वर्षांपूर्वी हजर झालेला तरुण सहकारी कर्मचारी म्हणाला की काळासोबत चालायचं असेल तर बदल स्वीकारावाच लागेल. संगणकावर काम करण्याला घाबरुन सेवानिवृत्ती घेत असाल तर तुम्ही चांगल्या बदलाला विरोध करताय असा अर्थ निघू शकतो. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी तुम्हाला सगळं शिकवतो, तुम्ही काळजीच करु नका. मला वाटतं बदल स्वीकारणारेच पुढे जातात. हा बदल स्वीकारण्यासाठी आधी तुमच्यातली नकारात्मकता फेकुन द्या. मनापासुन आत्मविश्वासानं, धैर्यानं म्हणा काहीही झालं तरी मी संगणकावरचं काम शिकणार आणि करणारंच. बदल सकारात्मकतेने घेतला की सगळं व्यवस्थित होईलंच. त्या तरुण मुलानं अत्यंत चांगल्याप्रकारे बदलाचं महत्व सांगितलं. त्यांना जास्तीचा वेळ देऊन शिकवलं. चार वर्षांनंतर ते सेवानिवृत्त झाले त्यादिवशी म्हणाले बदल हा मानवी जीवनाला अविभाज्य भाग आहे. कोणताही चांगला बदल स्वीकारलाच पाहिजे. मला तर वाटतं पावलापावलावर, अगदी क्षणोक्षणी बदल होतंच असतो. अगदी खरं आहे त्यांचं म्हणणं. बदल न स्वीकारणारे कधीच प्रगती करु शकणार नाहीत शिवाय सध्याच्या ह्या स्पर्धेच्या, संगणकाच्या युगात ते कालबाह्य ठरतील, बाहेर फेकले जातील. मुळात प्रश्न असा आहेकी चांगला बदल का स्वीकारायचा नाही? बदल न स्वीकारुन आपण काय साध्य करणार आहोत? भोवताली आपण पाहातो तेव्हा लक्षात येतं की सासु आणि सुनेचं फारसं पटत नाही कारण विचारांतील फरक अर्थात बदलंचना? खरं तर दोघींच्या विचारांम धील फरक अर्थात बदल एकमेकींनी मनापासून स्वीकारला, एकमेकींना समजून घेतलं आणि बदलाला आपलंसं करुन घेतलं की दोघींमध्ये छानसं नातं नक्कीच निर्माण होईल. सासु आणि सुनेत छानसं नातं निर्माण झालेली घरंही आपल्या जवळपासच आहेत. बदल न स्वीकारणं म्हणजे आपल्याच पायावर आपण कु-हाड मारुन घेण्यासारखं आहे. अमिताभच्या अंधा कानुन चित्रपटातील गाणं ऐका म्हणजे बदल किती गरजेचा आहे हे लक्षात येईलंच. रोते रोते हँसना सिखो. हसणं आणि रडणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत तसं जगणं आणि बदल ह्या जीवनरुपी एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दोन्ही बाजु असल्याशिवाय नाणं बाजारात चालत नाही तसं जगण्यातला बदल स्वीकारल्याशिवाय आपण प्रगतीपथावर राहुच शकणार नाही. बदल न स्वीकारलेल्या काही व्यक्ती, काही कंपन्या काळाच्या ओघात अतिशय मागे राहिल्या तर बदलाचा स्वीकार करणार्‍या व्यक्ती, कंपन्या काळासोबत राहुन छानशी प्रगती करताहेत. वयोमानानुसार प्रकृतीत होणारेही बदल आपण स्वीकारावेतंच. बदल हा काळाने आपला घेतलेला बदला नाहीय तर काळाने, त्याच्यासोबत राहण्यासाठी निर्माण केलेली संधी आहे. संधीचं सोनं करणारी व्यक्तीच स्पर्धेत टिकते. मनात येणारे नकारात्मक विचार बदलणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपण सकारात्मक विचार करुन योग्य दिशेनं वाटचाल करु शकतो नव्हे केलीच पाहिजे. खरं तर प्रत्येक सेकंदाला वागण्यात, बोलण्यात बदल होतच असतो. बदल शिवाय मानवी जीवन असुच शकत नाही.

(लेख क्र.342)

सुनील राऊत माळीगल्ली, भिंगार, अ.नगर.,

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा