साहित्य सहवास‘आवड’

 

आवड नाही अशी व्यक्ती असुच शकत नाही. व्यक्तीपरत्वे आवड वेगवेगळी असते. मला आवड आहे वाचन, लेखन, एकांकिका, नाटक, चित्रपट पाहण्याची, गाणी, व्याख्यानं ऐकण्याची, आपल्याजवळचं गरजूंना देण्याची, समाजकार्याची. पंधरा दिवसांपूर्वी एक व्यक्ती भेटली. तिची आवड ऐकुन मी अवाक झालो. त्या व्यक्तीला आवड आहे बँक पासबुकची क्रेडिट (जमा) साईड वाढवण्याची. म्हणुनच अधिकाधिक पैसा कमावण्यासाठी ती व्यक्ती वाममार्गाचा वापर करते, फसवते, खोटं बोलते. काही दिवसांपूर्वी आणखी एक व्यक्ती भेटली. तिची आवड मला योग्य वाटली, आवडली. ती व्यक्ती झाडांचं रोप लावुन त्याची काळजी घेते आणि दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असणार्‍या गावात स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवते. वरिल दोन्ही व्यक्तींवरुन व्यक्तीपरत्वे आवड वेगळी असते हे लक्षात येईल. कुणाची आवड काय असावी हे आपण ठरवु शकत नाही पण माझी आवड ही माझ्यासह अनेकांचं भलं करणारी असावी हे निश्चितच कौतुकास्पद, अनुकरणीय आहे. काही व्यक्तींची आवड अमुक एक भाजीच आवडते. (उदा. वांग्याचं भरित, बटाट्याची, मेथीची भाजी इत्यादी) खरंतर आपल्या पुढ्यात आलेलं जेवण हा महाप्रसाद समजुनच खावा. परिस्थिती नसणारांना, भाजीपोळीसाठी करावे लागणारे अथक परिश्रम एकदा डोळ्यांसमोर आणा म्हणजे आपण किती सुखी आहोत हे लक्षात येईल आणि अमुक एक भाजी आवडते असं न करता प्रत्येक भाजी आवडीनेच खाईन असं म्हणता येईल, त्यानुसार करता येईल. एखाद्या कृतीची, विचाराची, पदार्थाची आवड नसेल तर ती निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. अनेक तरुण मुलं अगदी मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करतात (चॅटिंग करणं ही त्यांची आवड.) हे असं रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे म्हणजेच आपली आवड आपलंच नुकसान करणारी असेल तर नक्कीच वाईट. एका घरात राहणार्‍या अनेक व्यक्तींची आवड वेगळी असु शकते. मला आवडेल तेच मी करणार हे म्हणण्यापुर्वी ते आवडणं आपल्या स्वतःसाठी किती चांगलं आहे, हितकारक आहे हे पाहणंही गरजेचं आहे. चांगल्या कृती, विचारांची आवड निर्माण करणं ही आज, काळाची गरज आहे. दुसर्‍यांना त्रास देणं ही एखाद्या व्यक्तीची आवड असते. ह्या अशा त्रास देण्यामुळं आपण काय साध्य करतो? ह्या एकाच प्रश्नाचा गांभिर्याने विचार केलाच पाहिजे. ह्या ऐवजी मी, गरजवंताला, माझ्याजवळचं देणारच अशी आवड निर्माण करता येऊ शकतेच आणि करणं गरजेचंही आहे. महत्वाचं म्हणजे तुमची आवड काय आहे ह्यावरुनच तुमचं व्यक्तीमत्व घडत असतं. तुम्ही भविष्यात नेमकं काय होणार हे तुमची आवड ठरवत असते. एका लहान मुलाला प्रश्न विचारण्याची आवड होती. प्रश्नाचं उत्तर मिळालं की तो पुढचा प्रश्न विचारायचा. ही त्याची आवड, त्याला जिज्ञासु बनवु शकली आणि उत्तरामधुन तो विचारपूर्वक पुढचा प्रश्न विचारल्याने माहितीचं भांडार त्याच्याजवळ निर्माण झालं. बँक पासबुकाच्या क्रेडिट साईडची वाढ व्हावी ही आवड म्हणजे निव्वळ स्वार्थ. एकवेळ अशी येईल की त्या विशिष्ठ व्यक्तीची आवड त्याला लखपती नक्कीच बनवणार पण आपली आवड जोपासण्यासाठी आपण काय-काय गमावलं हा एकच प्रश्न त्या व्यक्तीने स्वतःला विचारला तर असली आवड बदलणं गरजेचं आहे हे लक्षात येईल. माझ्या आवडीमुळं माझ्यासह इतरांचं भलं मी करणारच हा विचार आणि त्यानुसार कृती आपल्याला ’माणूस’ असण्याची जाणीव करुन देईलच. बरोबर आहे ना? तुमची आवड कळवाल मला?

(लेख क्र.298)

सुनील राऊत माळीगल्ली, भिंगार, अ.नगर., मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा