साहित्य सहवास – ‘आळस’

आळस केल्यामुळं, मी, काय-काय गमावलं? हा एकच प्रश्न स्वतःला कधी विचारालात का? नसेल विचारला तर जरुर विचाराच. अनेकांनं जे उत्तर मिळेल ते नक्कीच आश्चर्यचकित, थक्क करणारं असणार आहे. अंगात आळस भरुन राहाणं नक्कीच वाईट. असं म्हणतात की आळस हा व्यक्तीचा प्रथम क्रमांकाचा शत्रु आहे. दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने अभ्यास करण्याचा आळस केला तर चालेल का? नक्कीच नाही. कारण हा प्रथम क्रमांकाचा शत्रु त्याच्या करिअरची वाट लावणारच. वाढदिवसानिमित्त काहीजण (अर्थात जे दररोज उशिरानं ऊठतात ते) संकल्प करतात की वाढदिवसापासुन दररोज पहाटे पाच वाजता उठायचं, फिरायला जायचं, व्यायाम करायचा. वाढदिवसाच्या विशिष्ट दिवशी हा संकल्प पहाटे पाच वाजता उठुन पूर्ण होतो. साधारण आठ, दहा दिवस झाले की जाऊ दे आज थोडंसं उशिरानं उठुया असं दररोज म्हटलं जातं आणि आळस-मनावर व शरिरावर राज्य करु लागतो. पर्यायानं नुकसान होतं ते स्वतःचं. आपलं नुकसान, हाच आपल्या आळसाचा फायदा.

असं म्हटलं जातं की निसर्ग-परमेश्वर आपल्याला देऊन पाहातो आणि आपल्याकडून घेऊनही पाहतो. इतकं छान, अर्थपूर्ण मनुष्यजन्म आपल्याला मिळाला आहे तर मग आळस करुन हा अमुल्य जन्म वाया घालवायचा का? नक्कीच नाही. काही तरुण मुलं, सोशल मिडियावर चॅटिंग करत मध्यरात्रीपर्यंत जागतात आणि पर्यायाने सकाळी उशिराने उठतात कारण आळस. सॉक्रेटिस म्हणतात आळशीपणाने जीवन व्यतित करणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे. या एकाच वाक्यावरुन आपल्याला आळस प्रथम क्रमांकाचा शत्रु आहे हे लक्षात येईल. मुळात आळसानं जर आपण काहीच साध्य करुन शकत नसु, ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत नसु, व्यायाम करण्यापासुन दुरावत असु, चांगलं-सकारात्मक आत्मसात करत नसु, दुसर्‍यांना आनंदी-प्रसन्न ठेवु शकत नसु, आपल्या जगण्याला आपण नाकारत असु, स्वतःसाठी चांगलं असं अर्थात कुटुंब आणि समाजहितार्थ असं काहीच करु शकत नसु तर गांभिर्यानं विचार, मनन, चिंतन करा आणि आळसावर शंभर टक्के मात कराच. हा प्रथम क्रमांकाचा शत्रु आपल्या मन, शरिराची नासाडी करणार असेल तर याच्याइतकं वाईट काहीच असु शकत नाही. आता तुम्ही नक्कीच ठरवणार आळसावर मात करायचीच. फक्त ठरवु नका तर प्रत्यक्ष कृती कराच. ज्यामुळं आपण आळशी होत आहोत अथवा झालोत अशांची यादी करा अर्थात एका कागदावर लिहुन काढा. आजपर्यंत आळस करण्यामुळं मी, काय-काय गमावलं याचीही यादी करा. आठवुन पहा. त्यावेळी आळस करण्याचं कारण काय होतं. ते सुध्दा लिहा. (लिहायचा आळस मात्र करु नका.) आपला शत्रु आपल्यापेक्षा प्रबळ असेल तर आपण नक्कीच नष्ट होऊ. आपल्याला नष्ट व्हायचं नसेल तर शत्रुला नष्ट केलंच पाहिजे अर्थात आळसावर मात केलीच पाहिजे. कोणता आळशी माणूस समाधानीसुखी आहे याचा आवर्जुन विचार करा. आळस स्लो पॉयझनचं काम करतं हे म्हणणं अतिशोक्ती ठरणार नाही. आळशी माणसाचा चेहरा, देहबोलीच बरंचसं बोलत असते, आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. या प्रथम क्रमांकाच्या शत्रुला मी, नष्ट करणारच हा ठाम निर्धारच आपल्याला आळसावर मात करायला लावणार आहे. असंही आपण ऐकतो- तो फार आळशी आहे, त्याच्या नादी लागु नकोस- असं आपल्याबाबतीत कुणी म्हणालं तर आपल्याला कसं वाटेल याचाही विचार कराच. अर्थात त्याच्या नादी लागुन आपणही आळशी होऊ या वाक्याचा अर्थ बरंच काही सांगणारा, सावध करणारा आहे. आळस झटकुया.

सुखी-समाधानी आयुष्य जगुया. आ-आपल्यातली, ळ-मरगळ, स-सडवणार आपल्याला. चला, प्रथम क्रमांकाच्या शत्रुला संपवुया. छान जगुया.

(लेख क्र.294) सुनील राऊत माळीगल्ली, भिंगार, अ.नगर., मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा