गुन्ह्यात जप्त केलेल्या गोमांसाच्या चोरी प्रकरणात पोलिसांच्या संशयास्पद कारवाईची चौकशी करावी-अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार- मावळा प्रतिष्ठानचा इशारा

अहमदनगर- कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात छापा टाकून जप्त केलेले 3 ते 4 लाखाचे गोमांस महापालिकेच्या बुरुडगाव येथील अ‍ॅनिमल वेस्ट प्लांटमधून चोरीस गेले. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, पोलिसांच्या कारवाईची सखोल चौकशी करावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे यांनी दिला आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात निलेश म्हसे यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी झेंडीगेट परिसरात जप्त केलेल्या गोमांसाची विल्हेवाट लावण्यासाठी बुरुडगाव येथील अ‍ॅनिमल वेस्ट प्लांटकडे देण्यात आले. परंतु सदर गोमांसाची रितसर विल्हेवाट लावण्याची तपास अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांनी तसदी घेतली नाही. त्यामुळे अर्ध्या तासातच खासगी वाहनातून आलेल्या लोकांनी गोमांस प्लांटच्या बाहेर काढले.

सदर घटनेचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेले असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या सर्व घडामोडी पाहता स्थानिक पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे. गोमांस हे नाशवंत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची रितसर पद्धत आहे. गोमांसाची विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत तपास अधिकार्‍यांनी पंचासमक्ष थांबून राहणे तसेच चित्रीकरण करणे आवश्यक असताना ही प्रक्रिया राबविली गेली नाही. सदर गोमांसाच्या चोरीचा व्हीडिओ अज्ञात व्यक्तीने तयार केला आहे. सदर व्हीडिओ पोलिसांकडे कसा पोहचला याबाबत तसेच चित्रीकरण करणार्‍याचा शोध घेण्यात यावा. सदरची चोरी ही स्थानिक पोलिस अधिकारी, प्लांटचालक, तेथील नियुक्त मनपा कर्मचारी व गोमांस चोरणार्‍यांच्या संगनमताने घडल्याचा संशय असून, त्याची चौकशी व्हावी. सदर गोमांस पुन्हा बाजारात विकले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करावी, अशी मागणी म्हसे यांनी निवेदनातून केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा